Ajit Pawar Hinjewadi Visit Ajit Pawar 'x'
पुणे

Ajit Pawar : आपलं वाटोळं झालंय.., हिंजवडीचं सगळे IT पार्क बंगळूर, हैदराबादला चाललेत; अजित पवार संतापले

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा आय टी पार्क हिंजवडीत पाहणी दौरा केला.

मोहन कारंडे

Ajit Pawar

पुणे : तुषार झरेकर

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यानंतर आज (दि. २६) पुन्हा आय टी पार्क हिंजवडीत पाहणी दौरा केला. दोन आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन झाले आहे, हे तपासण्यासाठी आलेले अजित पवार कामात हलगर्जीपणा दिसताच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील खडेबोल सुनावले.

आयटी पार्क बंगळूर, हैदराबादला चाललंय...

अजित पवार यांचा पाहणी दौरा सकाळी सहा वाजता हिंजवडीच्या क्रोमा चौकातून सुरू झाला. दौऱ्यादरम्यान रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे पाहून त्यांचा पारा चढला होता. त्याचवेळी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर हे मंदिर पाडू नये असा आग्रह करत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावलं. "अहो असू द्या हो, धरण बांधताना मंदिरं जातातच की नाही? तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो आणि मग मला जे करायचंय ते मी करतो," अशा शब्दांत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, "आपलं वाटोळं झालंय हिंजवडीचं! सगळं आयटी पार्क माझ्या पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर बंगळूर, हैदराबादला चाललंय. तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. मी कशाला सकाळी सहा वाजता इथे आलोय? हे काम केल्याशिवाय आता गत्यंतर नाही," असे खडेबोल त्यांनी सरपंचांना सुनावले.

"आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात"

यावेळी अजित पवार म्हणाले की, "हिंजवडीत झालेल्या पहिल्या पावसाने अनेकांना त्रास सहन करावा लागला. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर हिंजवडीत काम करायला सुरुवात केली. प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी या परिसराची पाहणी करण्याचे ठरवण्यात आलं, सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन अडचणी सोडवण्यात येणार आहेत. काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही नाराज करायचं नाही. हिंजवडी परिसरातील वाहतुकीचं दुखणं कायमचं दूर करायचं असल्याने रस्त्यांचे रुंदीकरण करणार आहे. मागे दिलेल्या आदेशानुसार काही बांधकाम पाडावी लागली आहेत आणि ती पाडली आहेत."

मी जर मध्ये आलो तर माझ्यावरी 353 दाखल करा : अजित पवार

आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजीच्या विकास कामात जर कोणी आडवा येत असेल तर त्यांच्या विरोधात सरळ 353 दाखल करा. कुणाचाही विचार करू नका. मी जरी आडवा आलो तरी माझ्यावर पण 353 दाखल करा. त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूक कोंडी चे प्रश्न सुटणार नाहीत. अशा अतिशय कडक सूचना अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांना दिल्या आहेत.

व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडणार का?

दरम्यान, अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीनदोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळते. मात्र, हिंजवडीतील रस्त्यांची दुरावस्था, मेट्रोचे संथ गतीने चालणारे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचबरोबर नाल्यावरील बांधकामे आणि व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT