बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोटारीचे 1999 पासून सारथ्य करणारे चालक श्यामराव नारायण मणवे यांनी अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल कमालीचा शोक व्यक्त केला.
ते म्हणाले, “मंगळवारी दादांच्या मीटिंग लवकर संपल्या होत्या. त्यामुळे मी दादांना आपण रात्रीच कारने पुण्यात जाऊ, असे म्हणालो होतो. पण, दादा म्हणाले की, सकाळी विमानाने जातो. मी बारामतीच्या सभा आटोपून पुण्यात येतो, तू पुण्यात ये. पण, बुधवारी सकाळीच ही दुर्दैवी दुघर्टना घडली आणि अक्षरश: आकाश कोसळले. माझे आयुष्यच थांबले.
ते म्हणाले, मी दादांकडे 20 जानेवारी 1999 पासून चालक म्हणून सोबत आहे. दादा माझे दैवत होते. ते माझ्या घरी गणपतीला जेवायलासुद्धा आले होते. 2013 मध्ये मी शासनसेवेतून निवृत्त झालो. तेव्हापासून आजवर दादांकडेच काम करीत होतो. सकाळी साडेसातला दादा मुंबईतील बंगल्यातून निघाले आणि काही वेळातच ही बातमी समजली. माझ्या आयुष्यातील सर्वस्व गमावल्यासारखे आता वाटते आहे. मंगळवारी रात्रीच आम्ही पुण्यात मुक्कामी आलो असतो, तर कदाचित ही घटना घडली नसती, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.