इंदापूर : इंदापूर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूरचे आमदार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे या वेळी उपस्थित होते. भरणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.(Latest Pune News)
पवार या वेळी म्हणाले की, पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तसेच इंदापूरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता अंदाजे 117 टीएमसी इतकी आहे. उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे 70-80 किलोमीटरपर्यंत असून या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. येथे गोड्या पाण्यातील निर्यात करण्यायोग्य मासे उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय झाल्यास तेथील मत्स्यबीज संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे शक्य होईल तसेच इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणात शेततळे असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीसाठी करता येईल.
या बैठकीला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर हे मंत्रालयातून तर पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. स्वाती देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पशु, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नितीन पाटील हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
उजनी जलाशयाचा इंदापूर तालुक्यात मोठा पाणीसाठा आहे. तालुक्याच्या दोन्ही बाजूला भीमा आणि निरा नद्या आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि. 25) इंदापूर येथे कृषी पदवीधारकांचा मेळाव्यात बोलताना दिले होते. आजच्या निर्णयामुळे भरणे यांची घोषणा मूर्त स्वरूपात येण्यासाठीचे निर्णायक पाऊल पडले आहे.