पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री, लोकनेते अजित दादा पवार यांच्या आकस्मित व दुर्दैवी निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवार दि. २९ जानेवारी रोजी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने संपूर्ण दिवसभर बंद राहतील असा निर्णय पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला आहे. याविषयीची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी कळविली आहे.
जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी असल्याचे सांगत रांका म्हणाले, “अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग.
व्यवसाय व व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते सदैव स्मरणात राहील.”
या दुःखद प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयाप्रती व असंख्य समर्थकांप्रति आम्ही मनःपूर्वक शोक संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व या कठीण काळात कुटुंबीयांना आणि अनुयायांना दुःख सहन करण्याचे बळ देवो अशी प्रार्थना पितळीया यांनी केली.