पुण्याला आणखी तीन महापालिकांची गरज: अजित पवार (file photo)
पुणे

Pune News| पुण्याला आणखी तीन महापालिकांची गरज: अजित पवार

पोलिस अधिकार्‍यांना खडसावले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या सकाळी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या वेळी पाहणीदरम्यान शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या नागरीकरणावर भाष्य करताना त्यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज व्यक्त केली.

विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांचाही उल्लेख केला. मात्र, अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे दौर्‍यावर होते, त्यांना तीन महापालिकांसंदर्भात प्रश्न विचारला असता, पुण्याला तूर्तास तिसर्‍या महापालिकेची गरज नाही, भविष्यात विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  (Latest Pune News)

पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिकांची गरज असून, मांजरी-फुरसुंगी-उरुळी देवाची, चाकण आणि हिंजवडी अशा तीन महापालिका कराव्या लागणार आहेत, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चाकण (ता. खेड) येथील वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली.

पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील रस्ते व वाहतूक कोंडीची शुक्रवारी (दि. 8) सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या वेळी पोलिस आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त आणि महामार्ग तसेच विविध विभागाँचे वरिष्ठ अधिकारी, खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते आदींसह विविध राजकीय पक्षाँचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार्‍या चाकणमधील तळेगाव चौकात पाहणी केली. याच चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचार्‍यांना जावे लागते. या वेळी त्यांनी चाकणला स्वतंत्र

महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले. पवार म्हणाले की, कुणाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी मिळणार नाही.

चाकण एमआयडीसीमध्ये 1500 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. रस्त्याची कामे होत नाहीत, त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण झालेलं आहे. वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून ही समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क, चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

पोलिस अधिकार्‍यांना खडसावले -

अजित पवार पाहणी करण्यासाठी तळेगाव चौक येथे थांबलेले असताना पोलिसांनी पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक रोखून धरल्याने तळेगाव चौक ते आळंदी फाटा भागात प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

पवार म्हणाले की, मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागताहेत. मग ’पिक टाईम’मध्ये काय अवस्था होत असेल, वाहने रोखून धरल्याने उपमुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना खडसावले, हे बरोबर नाही. ही वाहने थांबवून कोंडी का केलीय? सगळी वाहतूक सुरू करा, असं अजित पवार म्हणाले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी अधिकार्‍यांना अनेक सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT