कामांच्या दर्जावरून उपमुख्यमंत्री पवारांनी ठेकेदारांना खडसावले Pudhari
पुणे

Ajit Pawar: कामांच्या दर्जावरून उपमुख्यमंत्री पवारांनी ठेकेदारांना खडसावले

पिंपळी येथील प्रशस्त ग््राामसचिवालयाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी : बारामती तालुक्यातील पिंपळी येथे ग्रामसचिवालयाच्या इमारत उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय नात्यांनी जोडलेल्या व्यक्तींवर थेट निशाणा साधला. विकासकामांच्या दर्जावरून त्यांनी ठेकेदारांना चांगलेच सुनावले आणि स्पष्ट इशारा दिला की, ‌‘ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ठेकेदारी करू नये. तसेच, ज्यांना ठेकेदारी करायची आहे, त्यांनी राजकारणात येऊ नये.‌’(Latest Pune News)

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अनेकवेळा विकासकामांच्या दर्जाबाबत तक्रारी येतात. सरकारकडून निधी दिला जातो. पण, काम वेळेत होत नाही. दर्जेदार काम न केल्यास लोकांचा रोष सरकारवर येतो. त्यामुळे ठेकेदारांनी जबाबदारीने काम करावे. त्यांनी ठेकेदारांना सुचविले की, दर्जा आणि पारदर्शकता राखल्यास कोणत्याही कामावर प्रश्नचिन्ह उरणार नाही. गावातील विकासकामांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, आता निधी मागण्याची गरज नाही. विविध योजनांमधूनच सगळी कामे पूर्ण केली जातील. ग्रामस्थांनी थोडी मेहनत घ्यावी, पुढाकार घ्यावा.

या वेळी परिसरातील तरुणांनी रस्त्यांवरील अडथळ्यांबाबत तक्रार केली असता अजित पवार मिश्किलपणे म्हणाले, “मीच टिकाऊ आणि खोरे घेऊन येतो, पैसे देण्याचे माझं काम आहे, वाद मिटवून काम करणं तुमचं.” त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. शेती आणि दुग्धविकास क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी प्रत्येकी 18 हजार रुपये दिले जात आहेत. पुढील काळात ही रक्कम कृषी विभागामार्फत देण्याचा विचार आहे. ग्रामस्थांना योजनांमधूनच विकास घडवून आणण्याचे आवाहन करीत त्यांनी प्रामाणिक आणि कार्यक्षम शासन हेच खरे उद्दिष्ट असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. परिसरातील उद्योग धंदा, कंपनी, कारखानदारांकडून अपेक्षित कर ग्रामपंचायतीकडे जमा होत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते 1 कोटी 33 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी प्रशस्त इमारत व वेगवेगळे विभाग, दालने पाहून समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष ढवाण यांनी केले. स्वागत संरपच स्वाती ढवाण यांनी केले.

या वेळी श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, गटविकास अधिकारी किशोर माने, संचालक सतीश देवकाते, अशोक ढवाण, रमेश ढवाण, उपसरपंच अजित थोरात, मंगलताई केसकर, अश्विनी बनसोडे, मंगल खिलारे, निर्मला यादव, मीनाक्षी देवकाते, राहुल बनकर, उमेश पिसाळ, वैभव पवार, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब भोइटे, नितीन देवकाते, हरीभाऊ केसकर, लालासो चांडे, आबासो देवकाते, सुनील बनसोडे, भाऊसो पिसे, महेश चौधरी, महादेव मदने, मोहन बनकर आदी उपस्थित होते.

पिंपळी येथील ग्रामसचिवालयाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT