प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘मीच चेअरमन होणार’ अशी घोषणा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटकसर ते उच्चांकी ऊसदर, अशी अनेक आश्वासने दिली असल्याने आता अजित पवार यांच्या हाती संपूर्ण सत्ता दिलेल्या सभासदांच्या वाढविलेल्या अपेक्षांचे ओझे घेऊन अजित पवार यांची ‘चेअरमन’पदाची कारकीर्द सुरू होणार आहे.
सभासदांनी अजित पवार यांनी प्रचार सभेत दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून कारखान्याची धुरा त्यांच्या हाती दिल्याने सभासदांसह सर्वांच्याच अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे. अनेक आश्वासनांची खैरात प्रचार सभेदरम्यान झाली. यामध्ये राज्यातील प्रथम पाच कारखान्यांमध्ये ‘माळेगाव’चा ऊसदर असेल, हे प्रमुख आश्वासन आहे. (Latest Pune News)
3636 रुपये प्रतिटन हा आत्तापर्यंत कारखान्याने दिलेला उसाचा सर्वाधिक दर आहे. आता अजित पवार यांना यापेक्षा कमी दरावर येता येणे शक्य नाही. हे शिवधनुष्य ते कसे पेलतात? यात त्यांची कसोटी लागणार आहे.
कारखाना सभासदांच्या ऊसदरावर कोणताही परिणाम न करता कारखाना परिसर, कामगार वसाहत, अंतर्गत रस्ते आदी हायटेक करणारा, निरा नदीप्रदूषणाचा मुद्दा गाजला, त्यावर देखील शासनाच्या माध्यमातून परिसरामध्ये अधिकचे दोन ईटीपी प्लांट बसवून प्रदूषण दूर केले जाईल, असे आश्वासनही अजितदादांनी दिलेले आहेच.
ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी दिल्या जाणार्या उचलीत व त्यामध्ये असणारा सगळा गोंधळ, याबाबत देखील लक्ष घालण्याचे अजितदादांनी भाष्य केले होते. ऊसवाढीसाठी शासनातर्फे राबविल्या जाणार्या मएआयफ तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे राबविणार, कामगारभरती, कामगारांचे पगार, बोनस आदींबाबत कडक राहणार. कारखाना संचालित शिवनगर विद्याप्रसारक मंडळातील शिक्षण संस्थांमध्ये देखील आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.
अत्यंत महत्त्वाचा आणि सभासदांमध्ये उत्सुकतेचा असलेला विषय म्हणजे संचालक मंडळाला कोणतीही गाडी, नाष्टा, जेवण मिळणार नाही. फक्त चहा किंवा उसाचा रस देण्याचे दिलेले आश्वासन, अशी अनेक आश्वासने अजित पवार यांनी दिली आहेत आणि ते बारामतीचे आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यातले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी थेट संपर्क असलेले मोठे नेते असल्याने त्यांच्याकडून ही आश्वासने सहज पूर्ण होतील, अशी सभासदांची पूर्ण खात्री झालेली असल्याने चेअरमनपदाचा काटेरी मुकुट अजित पवार कसा पेलतात, हे पाहावे लागेल.
कारखान्याचे कामकाज करताना दैनंदिन अनेक अडचणी निर्माण होतात. काही निर्णय त्याक्षणी घ्यावे लागतात. यामध्ये साखरेसह उपपदार्थांची विक्री, साहित्य खरेदी टेंडर, केंद्र तथा राज्य शासनाच्या बदलत्या धोरणाशी संबंधित निर्णय तत्कालीन परिस्थितीचा विचार करीत तातडीने घ्यावे लागतात. कामगार तसेच सभासदांच्या काही प्रापंचिक व घरगुती अडचणी, ऊसतोडीची अडचण, असे प्रश्न चेअरमन तसेच संचालकांमार्फत तातडीने सोडविले जातात.
अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचा कारभार पाहत असताना मिळणारा वेळ लक्षात घेता अजितदादांना कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान होऊन कारखान्यातील या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देता येईल का? याबद्दल देखील शंका वर्तविणारा सभासदवर्ग आहे.