भिगवण: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूच्या बातमीवर कोणालाही सहजासहजी विश्वास बसत नव्हता. साहजिकच, प्रत्येक जण खात्री करण्यासाठी फोन, सोशल मीडियावर संपर्क करीत होता. अखेर टीव्ही व मीडियावर त्यांच्या मृत्यूबाबत दुजोरा मिळाला आणि राजकीय, सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दादांच्या मृत्यूच्या घटनेने भिगवण व परिसर वेदना व दुःखाने अक्षरशः झोकाळून गोला. या घटनेने सर्वजण नि:शब्द झाले आहेत.
बारामती व भिगवणशी अजितदादांची नाळ पहिल्यापासून जुळलेली होती. त्यांचे असंख्य पदाधिकारी व नागरिकांशी जवळीकतेचे घट्ट नाते होते. अनेक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची या भागातील ठसकेबाज, धीरगंभीर, रोखठोक भाषणे ऐकण्यासाठी अलोट गर्दी होत होती. या वर्षीच्या अतिवृष्टीत परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होताच त्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. भिगवणची त्यांची ही शेवटची भेट ठरली.
दरम्यान, अजित पवारांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरताच बुधवारी भिगवण व परिसरात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. उद्या गुरुवारी दि. 29 रोजी देखील बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तर, गुरुवारी येथील मासळी बाजारही बंद ठेवण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुधवारी सकाळी अपघाताची कुजबुज सुरू झाली आणि क्षणात प्रचार थांबवण्यात आला.
त्यानंतर अपघात व दादांच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली. परंतु, यावर कोणालाही विश्वास बसायला तयार नव्हता. दादांच्या अकाली मृत्यूने अवघ्या महाराष्ट्राची हानी झाली आहे. रोखठोक व दिलदार माणूस गमावला आहे. याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल, असे मत पराग जाधव, सचिन बोगावत, अजिंक्य माडगे यांनी व्यक्त केले.
मच्छीमार गहिवरले; अश्रू अनावर
उजनीतील हजारो मच्छिमारांच्या संकटावर त्यांनी दोन वर्षापूर्वी तोडगा काढला होता. प्रदूषण व लहान आकाराच्या जाळ्यांमुळे उजनीतील देशी व प्रमुख कार्प जातींच्या प्रजाती धोक्यात येऊन मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभा राहिले होते. तसेच धरणातील मत्स्यसंपदा धोक्यात आली होती. यावरून अजितदादांनी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी दोन कोटी रुपये खर्चाचे मत्स्यबीज सोडण्याचा राज्यातील पहिला धोरणात्मक निर्णय घेतला. लहान मासेमारीवर कडक बंधने घातले होते. यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. या आठवणींना उजाळा देताना आज मच्छिमारांना अश्रू अनावर झाले होते.