अजित पवार आज बारामतीत घेणार इच्छुकांच्या मुलाखती File Photo
पुणे

Ajit Pawar Baramati Interviews: अजित पवार आज बारामतीत घेणार इच्छुकांच्या मुलाखती; नगराध्यक्षपदासाठी चुरस शिगेला

दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेग; पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (दि. 11) बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवकपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मातब्बर इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारा ची निवड करताना पवार यांना अनेकांना दूर ठेवावे लागणार आहे. पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.(Latest Pune News)

नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, माजी नगरसेवक शिवाजीराव कदम, माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगरसेवक जयसिंग देशमुख, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी आदींची नावे पुढे आहेत. इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. ही निवड करताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय निकष लावतात आणि कोणाची निवड करतात, याकडे लक्ष लागले आहे. पक्षातील गटबाजी टाळून एक सर्वसमावेशक आणि सर्वांना न्याय देणारा उमेदवार पुढे आणावा, अशी मागणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे. शहरातील विविध प्रभागांतून आलेल्या मतांनुसार, समाजातील सर्व घटकांना समान वागणूक देणारा आणि सर्व धर्म-जातींच्या कार्यक्रमात सहभाग घेणारा उमेदवारच नगराध्यक्ष झाल्यास शहराचा विकास गतिमान होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत. पालिका कामाचा अनुभव असणाऱ्याला संधी मिळाल्यास शहराच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे. केवळ सहीपुरता नगराध्यक्ष नको, अशी नागरिकांची भावना आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी अनेक इच्छुकांची चर्चा सुरू असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक निवडीत पवार कोणा-कोणाला स्थान देतात, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती

उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. भाजप-शिवसेनेकडून अद्याप फारशा हालचाली सुरू नाहीत. बहुजन समाज पक्षाने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयोजित मुलाखती व त्यानंतरच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात, याकडेही लक्ष लागले आहे.

अजित पवारांना बारामतीत रोज लक्ष देणे कठीण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद आहे. राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. परिणामी, बारामती नगरपरिषदेच्या कामकाजात त्यांना रोज उठून लक्ष घालणे आता शक्य राहिलेले नाही. त्यांच्या गैरहजेरीत हे काम चोखपणे बजाविणाऱ्या व्यक्तीलाच संधी मिळावी, शहराच्या प्रगतीसाठी ‌’काम करणारा, जोडणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा‌’ चेहरा निवडणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत.

बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा

आजच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार भाष्य करण्याचे संकेत

बारामती : बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पूर्ण तयारी केली आहे, तर अन्य पक्ष अद्यापही चाचपणी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षानेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. परंतु, दोन्ही राष्ट्रवादी येथे एकत्र लढतील, या चर्चेने शहरात जोर धरला आहे. गुरुवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मेळाव्यात ते यासंबंधी भाष्य करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा मोठा भरणा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणूक आम्ही भाजपला सोडून समविचारी पक्षांसोबत लढवू शकतो, असे वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी गत बारामती दौऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील का? या विषयावर थेट भाष्य करणे टाळले होते. अगोदर मुलाखती तर होऊ द्या, असे त्रोटक उत्तर उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले होते. परंतु, नकारही दिलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी पक्षकार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. परंतु, बारामतीत मात्र त्या अद्याप आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून बारामती व माळेगावसंबंधी कोणतेही भाष्य झालेले नाही. राज्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे चित्र आहे. बारामतीतही तीच स्थिती राहील, अशी चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाने काही जागांचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. या पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची आग््राही मागणी करण्यात आलेली आहे. त्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवेळी अशाच चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने तेथे पॅनेल उभा केला. त्याचा फायदाच उपमुख्यमंत्री पवार यांच्या पॅनेलला झाल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र लढतील का? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT