Ajit Pawar on Purandar Farmers
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवडसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या भागांची लोकसंख्या लक्षात घेता एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची नितांत गरज आहे. शहर आणि परिसराच्या दृष्टीने पुरंदर ही जागा योग्य आहे, त्यामुळे हे विमानतळ पुरंदर येथेच उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे ज्या गावांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्या शेतकर्यांना वार्यावर सोडले जाणार नाही, त्यांचे नीट पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळबाधित शेतकर्यांना पुन्हा एकदा दिली.
व्हीआयपी विश्रामगृहात शुक्रवारी विविध विभागांच्या आढावा बैठका आयोजित केल्या होत्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘ज्या शेतकर्यांची जमीन विमानतळासाठी संपादित होणार आहे, त्यांना विश्वासात घेऊनच हे काम केले जाणार आहे. अनेक पर्यायी जागांचा अभ्यास केला गेला आहे. मात्र, सध्या तरी पुरंदरशिवाय पुण्याजवळ दुसरी कोणतीही उपयुक्त जागा दिसून येत नाही.’ (Latest Pune News)
सध्याचे पुण्याचे विमानतळ संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येते व ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी 500 कोटी खर्च करून नव्या टर्मिनलचे काम पूर्ण केले आहे. मात्र, संरक्षण विभागाच्या अटी-शर्तींमुळे तेथे वेळोवेळी अडचणी येतात. उदाहरणार्थ, काहीवेळा
‘उद्या सकाळी 10 पर्यंत विमान उडवू नये’ असे आदेश दिले जातात. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेता दोन धावपट्ट्या, कार्गो सेवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक त्या सुविधा असलेले स्वतंत्र विमानतळ आवश्यक आहे.
शेतकर्यांचा विरोध असूनही त्यांना नाराज न करता, योग्य मोबदला देऊन त्यांना इतरत्र शेती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवीन प्रस्तावानुसार, या वेळी पूर्वीच्या तुलनेत कमी जागा घेतली जाणार आहे आणि त्या परिसरातीलच काही बाधितांचे पुनर्वसनही त्याच भागात केले जाणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून सुरू असलेल्या भूसंपादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनकाळात यासंबंधी बैठकीही झाल्या आहेत. पुरंदर भागातील नागरिकांनी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, हे माझे आवाहन असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.