बारामती : पुढारी वृत्तसेवा : आपले काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळविणारे अजित पवार यांनाही आता त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यामुळे घरातच तगडा झटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युगेंद्र पवार हे बुधवारी (दि. 21) येथील शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या गटाचे शहराध्यक्ष अॅड. संदीप गुजर यांनी ही माहिती दिली. बारामतीत नुकत्याच झालेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त माझा परिवारच माझ्यासोबत आहे, कुटुंबात मला एकटे पाडले जात असल्याचे सांगितले होते. त्याचा प्रत्यय येण्यास आता सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांचे सख्खे पुतणे असलेले युगेंद्र हे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास व शर्मिला पवार यांचे युगेंद्र हे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार बारामतीत कुस्तीगीर संघाचे काम करत होते. त्यानंतर ही जबाबदारी आता युगेंद्र यांनी घेतली आहे. शर्मिला पवार या शरयू फौंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असून बारामती-इंदापूर तालुक्यात त्यांना मानणारा स्वतंत्र गट आहे. युगेंद्र हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. याशिवाय व्यावसायिक जबाबदार्या ते सांभाळतात. ते आता शरद पवार यांच्या बाजूने खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरतील हे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा