उद्या बारामतीमध्ये अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIPs) येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. पुण्याच्या लोहेगाव वायुसेना तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण तज्ज्ञांचे (ATC) एक विशेष पथक तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहे.
वायुसेनेचे पथक अत्यावश्यक तांत्रिक उपकरणे आणि संवाद यंत्रणेसह बारामतीत दाखल झाले आहे. बारामती विमानतळावर तात्पुरत्या स्वरूपात 'इमर्जन्सी एअर ट्रॅफिक कंट्रोल' सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या येण्या-जाण्यासाठी तांत्रिक समन्वय राखण्याचे काम हे पथक करणार आहे. उद्या, गुरुवारी (दि. २८) होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (संदर्भानुसार), त्यांचे पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्या सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे.
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचले असून प्रांगणात कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली आहे. अजितदादा परत या, अशा घोषणा देताना कार्यकर्त्यांची डोळे पाणावले आहेत. अजित पवारांचे पार्थिव मैदानात आल्यानंतर पोलीस दलाच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात', असं शरद पवारांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे पार्थिव रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने रवाना झाले असून शववाहिनीत जय पवार हे अजित पवारांच्या पार्थिवाजवळ बसले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले असून उद्या दोन्ही नेते मुंबईतून थेट बारामतीला अंत्यविधीसाठी पोहोचतील. तर राज ठाकरे, रामदास आठवले, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, योगेश कदम, दादा भुसे हे पुण्यात मुक्कामी असतील. उद्या सकाळी हे सर्व नेते बारामतीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री उशिराच बारामतीला जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारपासून तिथे कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून राष्ट्रवादीती नेते आणि पदाधिकारीही तिथे पोहोचले आहेत.
मी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना अजित पवारांना बऱ्याचदा भेटलो. प्रत्येक विषयावर ते सखोल चर्चा करायचे. मंत्रिपदी असताना सकाळी आठ वाजता कार्यालयात पोहोचायचे. अर्थ खाते आणि विकास कामांवर त्यांची परड होती, अशी आठवण माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितली.
डीजीसीए आणि फॉरेन्सिक टीमचे पथक विमान कोसळले त्या ठिकाणी पोहोचले आहेत. अधिकारी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत.
तीन वर्षांपूर्वी जो विमान अपघातग्रस्त झाला, त्याच विमानातून अति महत्त्वाच्या व्यक्तीला प्रवासाची परवानगी कशी काय दिली जाते, या अपघाताबाबतही असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक पत्रकारांनीही सोशल मीडियावर या कंपनीबाबत शंका व्यक्त केली आहे. ही गंभीर बाब असून अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आप प्रवक्ते अनुराग ढांडा यांनी केली.
AAIB – एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे पथक VSR Aviation च्या कार्यालयातून बाहेर पडले. अधिकाऱ्यांनी कंपनीतून काही फाईल्स ताब्यात घेतल्याचे समजते.
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाची सहवैमानिक शांभवी पाठक हिचाही मृत्यू झाला आहे. शांभवीची आजी मीरा पाठक यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "सकाळी 11 वाजता आम्हाला अपघाताची माहिती मिळाली. मी गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला शेवटची भेटले होते. ती चौथी- पाचवीपर्यंत आमच्यासोबत होती. नंतर ती दिल्लीला गेली. शांभवीचे आईवडील दिल्लीत राहत असून तिला एक लहान भाऊ आहे."
दिल्लीवरून आलेले डीजीसीएचे पथक लवकरच घटनास्थळावर पोहोचत आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासोबतच अपघात झालेल्या चार्टर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. फॉरेन्सिक टीम यापूर्वीच घटनास्थळी पोहोचली आहे.
आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली, अशी पोस्ट रुपाली चाकणकर यांनी शेअर केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्यासाठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी आज त्यांचा नाटकाचा प्रयोग रद्द केला आहे. 'लग्न पंचमी' या नाटकाचे पुणे इथला प्रयोग आज रद्द करणात आला असून नाटकाचे कलाकार स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांनी अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
समाजमाध्यमांवर अपघातग्रस्त विमानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील एका फोटोमध्ये अर्धवट जळालेली विमानाची सीट, फाईल्स आणि कागदं दिसत आहेत. अखेरच्या क्षणीही अजित पवार विमानात काम करत होते, अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.
बुधवारी दुपारपर्यंत अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ठेवले गेले होते. या परिसरात पाच किलोमीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णालयासमोर कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते.
अजित पवार हे जय-पराजयानंतरही कार्यकर्त्यांची ओळख ठेवणारे नेते होते. रांगड्या शैलीत बोलत असले तरी, त्यांच्या बोलण्यातून प्रेम व जिव्हाळा जाणवत असे. गेल्या महिन्यात २५ डिसेंबरला चांदणी चौकातील मुहूर्त मंगल कार्यालयात अचानक त्यांची भेट झाली. मला पाहताच ते म्हणाले, "चंद्रकांतराव, असे किती दिवस दूर राहणार? या, आपण एकत्र चांगले काम करू..." पण त्यांची ही अखेरची भेट ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना शिवसेनेचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांची बारामतीत भेट घेत सांत्वन केले.
“आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला आहे. त्यांचे आकस्मिक निधन हे धक्कादायक आणि मन पिळवटून टाकणारे आहे. ज्या-ज्या वेळी आमची भेट झाली, त्या प्रत्येक वेळी दादा हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहूनच काम केले पाहिजे, यावर भर द्यायचे. महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, ही त्यांची कायमची आग्रही भूमिका होती. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता मी अगदी जवळून अनुभवली आहे, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीतील रुग्णालयात पोहोचले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन हे देखील रुग्णालयात पोहोचले.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे, पिंपरी- चिंचवडसह राज्यभरात शोककळा पसरली आहे. नवी मुंबईतील APMC बाजारपेठेत कडकडीत बंद असून दुकान बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असून धाराशिवमधील तेर या गावातही शोककळा पसरली आहे. गावात बंदची हाक देण्यात आली असून हे गाव अजित पवारांची सासरवाडी आहे. याशिवाय दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या केडगाव, यवत, बोरीपारधी तसेच मावळ, शिरुर तालुक्यांमधील गावांमध्येही बंदची हाक देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवार यांना सांत्वनपर फोन. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असून याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामती विमानतळावर पोहोचले असून या तिघांना घेण्यासाठी विमानतळावर पवार कुटुंबातील सदस्य आले होते. त्यांना पाहताच सुप्रिया सुळेंना रडू अनावर झाले तर सुनेत्रा पवार यांचे डोळेही पाणावले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतील रुग्णालयात पोहोचले आहेत. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. अजितदादा अमर रहे, अजितदादा परत या.. अशा घोषणा देताना कार्यकर्ते भावूक. पवार कुटुंबातील इतर सदस्यही थोड्याच वेळात बारामतीला पोहोचतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शारदा प्रांगण या ठिकाणी ठेवण्यात येणार असून अंत्यविधी उद्या दिनांक 29/ 1 /2026 रोजी विद्या प्रतिष्ठान येथे होणार आहे.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केलं आहे की त्यांनी अद्याप कोणालाही समन्स बजावलेले नाहीत. या प्रकरणाचा अधिकृत तपास आता AAIB – एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आला असून, पुढील सर्व चौकशी आणि निर्णय AAIB घेणार आहे.
आमचे अजितदादा स्वभावाने जरी फटकळ असले तरी मनाने खूप निर्मळ होते. दादा नेहमी तोंडावर फटकळ बोलायचे मात्र नंतर फोन लावून त्या माणसाचं काम करायचे. अनेक दिवस मी दादांसोबत काम केलं होतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दुबईतून दिली.
"महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती", केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची X वर पोस्ट.
आपल्या अजितदादांच्या निधनाची बातमी मनाला पटत नाहीये. दादा गेल्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली असून त्यांच्यासारखा नेता होणे नाही. आता ही पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. दादा स्पष्ट पणे काम करायचे, अशी शब्दात मनोज जरांगे- पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर शरद पवार यांना सकाळी ब्रिच कँडी रुग्णालयात चेकअप करण्यासाठी नेण्यात आले. तपासणीनंतर शरद पवार पुन्हा सिल्वर ओक वरती आले आणि आता ते पुन्हा वाहनाने बारामतीसाठी निघाले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौकशीची मागणी केली आहे. “इथे कोणीही सुरक्षित नाही. अजित पवार पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होते, हे मी स्वतः पाहिलं होतं. अशा परिस्थितीत हा अपघात कसा झाला", हा गंभीर प्रश्न असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य तपास व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधन झाल्याने पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज आणि उद्या पुणे शहर बंद ठेवण्यात येणार आहे. यासोबतच उद्या मार्केटयार्ड बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याचे आदेशांमध्ये नमूद आहे.
राजकारणातील दादा गेला... अशी भावना राज्याच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. अजित पवार यांच्यासारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे पाच वाजेपासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
यावेळी त्यांना नागपुरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना रडू कोसळले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. सकाळीच अशी बातमी कानावर पडणे अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील. दादांचे अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे.
अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
जिजाई या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात
सध्या जिजाईवर अजित पवार कुटुंबातील कोणीही सदस्य नाहीत
शरद पवार मुंबईत..मुंबईतील सिल्वर ओकवर
शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यास सुरुवात
थोड्याच वेळात शरद पवार बारामतीसाठी निघणार..
मुंबई पोलीस सन 2009 बॅच पोलीस शिपाई विदिप जाधव यांचा आज सकाळी DCM अजित पवार यांचे PSO कर्तव्य बजावत असताना विमान अपघात मृत्यूझाला
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू; बारामती अपघातात 6 जणांचा मृत्यू, संपूर्ण विमान जळून खाक
Ajit Pawar Plane Crash:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या विमानाला बारामती येथे लँडिंगदरम्यान अपघातझाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी बारामतीत येत असताना हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमानाचा तोल गेला आणि रनवेवर उतरताना तांत्रिक अडचण आल्याने विमानाला धक्का बसला. या घटनेनंतर विमानतळ परिसरात तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत अजित पवार गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र विमानाला नेमकं किती नुकसान झालं, तसेच अपघाताचं कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण आहे. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत चौकशी केली. दरम्यान, विमान वाहतूक आणि तांत्रिक पथकाकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेबाबत अजित पवार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत निवेदन येण्याची प्रतीक्षा आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या अपघाताबाबतचं पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.