

बीड : आम्हालाही स्वप्न पाहायचं आहे, डॉक्टर-कलेक्टर व्हायचं आहे; पण शाळेत प्यायला पाणी नाही, बसायला जागा नाही आणि खेळायला साहित्यही नाही. मग आम्ही शिकायचं कसं? आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच राहायचं का? अशी काळीज पिळवटून टाकणारी आर्त साद बीड जिल्ह्यातील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने घातली आहे. परभणी केसापुरी (ता. बीड) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या एका वर्षात केवळ बैठका आणि आश्वासनांची खैरात झाली, असा सूर उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर अंकिताने आपल्या पत्रातून शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे, वर्गखोल्यांमध्ये साधे बाक नाहीत आणि खेळाचे साहित्यही नाही. शिक्षकांविषयी आम्हाला आदर आहे, पण सुविधांअभावी आमचे नुकसान होत आहे, असे तिने पत्रात नमूद केले आहे.
अंकिताच्या पत्राने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला आहे. सरकारी कागदपत्रांवर शाळेत वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य, डिजिटल शिक्षण आणि प्रोजेक्टरसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळेत यापैकी काहीच उपलब्ध नाही. आमच्याकडे काहीच नाही, सगळं फक्त कागदावरच आहे, असा आरोप या चिमुकलीने केला आहे. जर जिल्ह्यात कोळवाडीसारख्या आदर्श शाळा उभ्या राहू शकतात, तर आमच्या शाळेवरच अन्याय का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.
नेहमी आपल्या रोखठोक कामासाठी ओळखले जाणारे अजित पवार या चिमुकल्या अंकिताच्या पत्राची दखल घेणार का? आणि कागदावर शाळा डिजिटल करणार्या अधिकार्यांवर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एका लहान मुलीला थेट सत्तेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला पत्र लिहावे लागणे, हे बीडमधील शिक्षण व्यवस्थेचे अपयश अधोरेखित करते. अंकिताने विचारलेला, आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच राहायचं का? हा प्रश्न केवळ प्रशासनालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारा ठरला आहे.