पुणे

कमी पावसाला हवेचा दाबच जबाबदार; अल निनो, ला निना तटस्थ असताना अनेक वेळा पडला आहे पाऊस

Sanket Limkar

[author title="आशिष देशमुख" image="http://"][/author]

पुणे : अल निनोचा प्रभाव संपला आहे. ला निना तटस्थ असताना यापूर्वी अनेकवेळा पाऊस पडल्याचे दाखले आहेत. यंदाची परिस्थिती तशीच असताना पावसाने दडी का मारली असावी? याला हवेचे कमी-जास्त होणारे दाब हेच जबाबदार असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

एका वर्षाच्या वर्चस्वानंतर अल- निनो ने मे 2024 मध्ये प्रशांत महासागरावरील आपली पकड सोडली. आता ला-निनादेखील तटस्थ स्थितीत आहे. प्रशांत महासागराचे तापमान 13 अंश सेल्सिअसवर खाली आले आहे. मात्र, हिंदी महासागराचे तापमान 30 अंशांवर आहे. तसेच हवेचा दाब हिंदी महासागरावर 1007 ते 1008 हेक्टापास्कल इतके आहेत. राज्यात मात्र हे दाब 1005 ते 1006 इतके आहेत. त्यामुळे मान्सून सक्रिय होण्यात अडचणी येत आहेत.

हवेचा दाब टाकत आहे प्रभाव

हवामानतज्ज्ञांच्या मते यंदा मान्सून भारतात वेळेआधीच आला असला, तरीही समुद्रावरील हवेचा दाब आणि जमिनीकडील भागाकडचा दाब हा जवळ जवळ सारखाच आहे. समुद्रावर 1007 ते 1008 हेक्टापास्कल इतका दाब आहे.

मार्च ते जून या कालावधीतील उष्ण व थंड वार्‍यांचा
प्रभाव कसा बदलतोय ते दाखवले आहे.

मात्र, महाराष्ट्रासह एकूणच भारतात हवेचा दाब 1005 ते 1006 इतका आहे. हा जेव्हा कमी होतो, तेव्हाच मान्सूनचे वारे सक्रिय होऊन पाऊस पडतो. मात्र, दाब सतत कमी जास्त होत असल्याने रिमझिम, हलका, मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस यंदा 19 जूनपर्यंत पडला आहे.

चारवेळा होती तटस्थ स्थिती

यापूर्वी 1972 पासून ते 1985 या तेरा वर्षांच्या कालावधीत अल-निनो आणि ला-निनाची स्थिती तटस्थ होती. मात्र, या कालावधीत जूनमध्ये कमी पाऊस पडेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात जूनमध्ये चांगला पाऊस झाला.

यात अल निनो व ला निनाची स्थिती
तटस्थ कशी आहे, ते दाखवले आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे केवळ अल निनो आणि ला-निना हीच स्थिती कमी पावसाला कारणीभूत नाही. अनेक कारणे आहेत. त्यापैकी हवेचे कमी-जास्त होणारे दाब हे महत्त्वाचे कारण असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत.

जागतिक हवामान संघटनेने नोंदवलेले निरीक्षण

  • जुलै ते सप्टेंबरदरम्यान ला-निना सक्रिय होणार आहे. त्यामुळे पाऊस वाढू शकतो. ही शक्यता 65 टक्के आहे.
  • प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान 13 अंश इतके थंड झाले आहे. हिंदी महासागराचे तापमान मात्र 30 अंशांवर आहे.
  • आता थंड पाणी प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर येऊ लागले आहे. त्यामुळे आता वातावरण आणि महासागर दोन्ही अल-निनोपासून दूर गेले आहेत. हा कार्यक्रम खरोखरच संपला आहे.

अल-निनो आणि ला-निना या जागतिक हवामानावर प्रभाव टाकणार्‍या घटना आहेत. सध्या हे दोन्ही घटक तटस्थ आहेत. हे खरे आहे पण त्याचा थेट प्रभाव भारतीय मान्सूशी जोडता येणार नाही. कारण 1 जूनपासून भारतात कुठेही फारसे कमी दाबाचे क्षेत्र, कमी दाबाचे पट्टे तयार झाले नाहीत. त्यामुळे मान्सून अडखळला आहे. तो 20 जूनपासून कोकणासह मुंबईत सक्रिय झाला आहे.

– डॉ. मेधा खोले, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा.

 

मी 2 जून रोजीच सांगितले होते की यंदा जूनमध्ये मोठा पावसाचा खंड आहे. त्याचा अर्थ असा नाही की यंदा पाऊसच राहणार नाही, पाऊस चांगलाच आहे. फक्त जूनमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास वेळ लागणार आहे. झालेही तसेच, हवेचा दाब असमान असल्याने देशात अन् राज्यात पाऊस कमी पडत आहे. या आठवड्यात ही परिस्थिती बदलून पाऊस वाढणार आहे.

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT