AI to detect cyber crimes
पुणे: राज्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार असून त्यासाठी सुमारे पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे गुन्हे गोल्डन अवर्स म्हणजे 1 ते 5 तासांत दाखल झाले तर राज्याबाहेरील आरोपीसुद्धा काही तासांत पकडणे शक्य आहे.
तसेच, ड्रग रॅकेटला पायबंद घाळण्यासाठी शाळा- कॉलेज बाहेरील टपऱ्यांवर पोलिसांचा वॉच ठेवला जात आहे. यात पोलिस अधिकारी सामील असल्याचे पुरावे मिळाले तर त्यांना तत्काळ बडतर्फ करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. (Latest Pune News)
पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरात कदम यांनी ही माहिती दिली. त्यांच्याकडील पाच खात्यांमधील सुधारणांसह निर्णयांची माहिती आणि राजकीय प्रश्नांवर उत्स्फूर्त उत्तरेही त्यांनी दिली.
पुणे, मुंबईसह राज्यातील सायबर गुन्ह्यांतील होणाऱ्या वाढीबाबत प्रश्नावर ते म्हणाले, सायबर गुन्हे तत्काळ दाखल झाले तर आरोपी लवकर शोधणे शक्य आहे. कारण गृहखाते यासाठी कृत्रिम बुद्धित्तेचा (एआय)चा वापर करत असून त्यासाठी राज्यातील पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात हवालदार, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस निरीक्षक यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
गृहराज्यमंत्री कदम उवाच...
सायबरफॉडच्या तक्रारी लवकर दाखल करुन घेण्यावर जनजागृती करणार
त्यासाठी 1930 या टोलफी क्रमांकावर तक्रार करावी.
राज्यात गुटखा अजूनही बाहेरच्या राज्यातून येत आहे.
तो रोखण्यासाठी सीमाभागांवर कडक तपासणी वाढवणार
ड्रगरॅकेट संपविण्यासाठी अन्न-औषध प्रशासन आणि गृहविभाग एकत्र कारवाई करणार
सायबर गुन्हे शोधण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एल ॲन्ड टी कंपनीशी सामंजस्य करार
दुधभेसळ आता जागेवरच पकडली जाणार,त्यासाठी मिल्कोस्कॅन यंत्रणा सज्ज
धान्य गोदामातील चोऱ्यावर सरकारचे बारीक लक्ष
अन्न निरीक्षकांच्या 394 जागांची भरती केली. त्यामुळे तपासणी वेगाने होणार
औषध भेसळ पकडण्यासाठी तीन नव्या प्रयोगशाळा तयार करणार यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये तयारी सुरू
ड्रग माफियांचा शाळा- कॉलेजवरील तरुणाईवर डोळा असल्याने जवळील टपऱ्यांतून हे रॅकेट चालते या प्रश्नावर गृहराज्यमंत्री म्हणाले, शाळा- कॉलेज बाहेरील टपऱ्यांवर आता पोलिस वॉच ठेवून आहेत. यात पोलिस अधिकारी सामील असल्याचे पुरावे मिळाले तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल.