भवानीनगर: राज्यातील लाखो शेतकर्यांचे जगण्याचे ऊस हे मुख्य पीक आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्टिफिशियल तंत्रज्ञान (एआय) वापरून आपण शेती केली तर तो गेमचेंजर ठरणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
भवानीनगर येथे श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
छत्रपती कारखाना हार्वेस्टर मशीन घेण्यासाठी 25 लाख रुपये बिनव्याजी देत आहे, याचा ऊस वाहतूकदारांनी फायदा घ्यावा. जास्त हार्वेस्टर मशीन घ्यावेत, एआयसाठी देखील कारखाना सहकार्य करीत आहे. बारामती तालुक्यातील एक हजार शेतकर्यांचे या तंत्रज्ञानामुळे 35 ते 40 टन उसाचे उत्पादन वाढले आहे. या तंत्रज्ञानामुळे खत, पाणी औषधांची मोठी बचत होत आहे, असेही पवार यांनी सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी एआयसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी वापर केला पाहिजे. पुढील महिन्यात शेतकर्यांचे ठिबक सिंचनचे राहिलेले अनुदान मिळणार आहे. राजेंद्र पवार म्हणाले, एआय तंत्रज्ञानामुळे खते, औषधे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. हे तंत्रज्ञान नवीन आहे, परंतु ते वापरावेच लागणार आहे. पृथ्वीराज जाचक म्हणाले, एआयचा सर्वांनी वापर केला पाहिजे. 40 टनापर्यंत उसाच्या उत्पादनात वाढ होत आहे. कारखान्यामार्फत 600 शेतकर्यांना हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे.
तर उसाचं कांडही बाहेर जाणार नाही
मी सत्तर एकरामध्ये एआयचा वापर केला आहे. दत्तात्रय भरणे आपण कृषिमंत्री आहात, तुम्हाला देखील या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. माळेगाव, सोमेश्वरपेक्षा छत्रपतीचा उसाचा दर कमी होता. त्यावेळी मी छत्रपतीलाच ऊस दिला. माळेगावच्या बरोबरीने भाव द्या, छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातील एक उसाचं कांडही बाहेर जाणार नसल्याचे पवार म्हणाले.
डोर्लेवाडी शाळेचा प्रश्न पुढील महिन्यात मार्गी
तीन वर्षांमध्ये कारखान्याची वार्षिक सभा झाली नाही. त्यामुळे पुढील महिन्यांमध्ये वार्षिक सभा होणार आहे. त्यावेळी डोर्लेवाडी शाळेच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेल. ती जागा रयत शिक्षण संस्थेला देऊन टाकावी. शरद पवार या ठिकाणी इमारत बांधून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेकडे तीन कोटी रुपये जमा केलेले आहेत. यामध्ये आणखी काही मदत लागली तर मी आहेच. किमान चार कोटी रुपयांची नवीन वास्तू उभी राहील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
रस्ता खोदला तर दंड लावणार
श्री छत्रपती कारखान्याच्या परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपये देत आहे. पुढील टप्प्यामध्ये आणखी दहा-पंधरा कोटी रुपये देतो. ज्यांना पाइपलाइन टाकायची आहे, त्यांनी आताच टाकून घ्या. पुन्हा रस्ता खोदला तर दंड लावला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना पवार यांनी दिला.