AI in Entertainment Pudhari
पुणे

AI in Entertainment: लघुपट, वेब सीरिज, म्युझिक अल्बम क्षेत्रातही ‌‘एआय‌’ची एंट्री

तरुणाईकडून सध्या लघुपट, वेब सीरिज अन्‌‍ म्युझिक अल्बमची निर्मिती वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे:‌ ‘एआय टूल्स वापरून होणारे लघुपटांचे एडिटिंग, वेबसीरिजच्या जाहिरातींसाठी काही मिनिटांत तयार होणारे आकर्षक पोस्टर्स आणि म्युझिक अल्बममध्ये ‌‘एआय‌’च्या साहाय्याने तयार केलेल्या दृश्यांचा वापर... सध्या मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोरदार एन्ट्री झाली असून, लघुपट, वेब सीरिज आणि म्युझिक अल्बम या तिन्ही क्षेत्रांतही ‌‘एआय‌’ची क्रांती पाहायला मिळत आहे. या क्षेत्रात ‌‘एआय‌’ हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता ‌‘क्रिएटिव्ह पार्टनर‌’ म्हणून समोर येत आहे.

लघुपट, वेब सीरिज आणि म्युझिक अल्बमची निर्मिती करणाऱ्या तरुणांकडून ‌‘एआय‌’चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. वेळ आणि खर्चाची बचत, सर्जनशीलतेला चालना, उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स-साउंड इफेक्ट्‌‍स, डबिंग, सबटायटल्स आणि भाषांतर प्रक्रिया अधिक सुलभ होणे, असे कित्येक फायदे ‌‘एआय‌’मुळे होत आहेत. तरुणाईकडून सध्या लघुपट, वेब सीरिज अन्‌‍ म्युझिक अल्बमची निर्मिती वाढली आहे.

काळ बदलताना आता या क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लघुपट आणि वेब सीरिजचे पोस्टर असो, टीझर तयार करण्यासाठी ‌‘एआय‌’ तंत्रज्ञान वापरले जात आहे. लघुपटांच्या क्षेत्रात ‌‘एआय‌’चा वापर संहितालेखनापासून एडिटिंगपर्यंत होताना दिसत आहे.

काही मिनिटांत कथा, संवाद आणि दृश्यांची रूपरेषा तयार करणारी एआय टूल्स आता सहज उपलब्ध झाली आहेत. व्हिज्युअल इफेक्ट्‌‍स, रंगसंगती आणि साउंड इफेक्टसाठी एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. काही तरुण निर्माते ‌‘एआय‌’च्या मदतीने संपूर्ण लघुपट तयार करण्याचे धाडसी प्रयोग करीत आहेत.

‌‘वेब सीरिज‌’च्या जगातही ‌‘एआय‌’चा वापर होत आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, पाहण्याच्या सवयी आणि ट्रेंड्‌‍स यांचा अभ्यास करून एआय निर्मात्यांना कोणती कथा अधिक लोकप्रिय ठरेल, याचा अंदाज देत आहे. त्याचबरोबर डबिंग, सबटायटल्स, भाषांतर आणि जाहिरातीसाठींचे पोस्टर्स तयार करण्यासाठी ‌‘एआय‌’चा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यामुळे मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमधील वेब सीरिजसाठी एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे.

म्युझिक अल्बममध्ये ‌‘व्हिज्युअल मॅजिक‌’

म्युझिक अल्बमच्या क्षेत्रात ‌‘एआय‌’ने दृश्य सादरीकरणाचा चेहरामोहरा बदलला आहे. गाण्यांनुसार एआयद्वारे तयार केलेली दृश्ये, लोकेशन्स आणि ॲनिमेशनचा वापर वाढला आहे. म्युझिक अल्बममधील संगीतासाठी ‌‘एआय‌’चा वापर होत आहे. याविषयी अजय नाईक सांगतात की, म्युझिक अल्बममध्ये विविध लोकेशन्स दाखविण्यासाठी ‌‘एआय तंत्रज्ञान‌’ वापरले जात आहे. म्युझिक अल्बममध्ये यामुळे दृश्य सादरीकरण अधिक प्रभावी झाले आहे.

अनेक तरुण निर्माते-दिग्दर्शकांकडून लघुपटनिर्मितीसाठी ‌‘एआय‌’ तंत्रज्ञान वापरले जात आहे. संहितालेखन, एडिटिंग आणि पोस्टर तयार करण्यासाठी आम्हीही ‌‘एआय‌’चा वापर केला असून, त्यामुळे लघुपट अधिक प्रभावी बनला आहे. भविष्यात एआयमुळे लघुपट नक्कीच जागतिक स्तरावर पोहचतील.
- नितीन पवार, लघुपट दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT