पुणे : लहान मुलांना वाचनाकडे वळविण्यासाठी प्रकाशन संस्थांसह बालसाहित्यिक आता नवनवे प्रयोग करू लागले असून, या नव्या प्रयोगांमुळे पुस्तकवाचनाची दुनिया लहान मुलांना आवडू लागली आहे. प्रामुख्याने लहान मुलांसाठी कथांपासून ते कवितासंग्रहांमध्ये असे नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून (एआय) तयार केलेली चित्रे असो वा एखाद्या बालकथेवर आधारित ऑडिओ बुक यांची निर्मिती केली जात आहे. तसेच, पटकन वाचून होतील अशा छोट्या पुस्तकांचीही निर्मिती होत आहे. नव्या प्रयोगांमुळे वाचनाकडे लहान मुलांचा कल वाढला आहे. मुलांनी पुस्तके वाचावीत, हाताळावीत आणि पुस्तकांच्या जगात रमावे, यासाठी छापील पुस्तकांच्या माध्यमातही प्रकाशक आणि बालसाहित्यिकांकडून नवीन प्रयोग केले जात आहेत. (Latest Pune News)
बालवाचकांना वाचनाकडे आणि पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी एआयचाही वापर होत आहे. एआयच्या माध्यमातून तयार केलेली चित्रे असो वा पुस्तकांवरील ऑडिओ बुक्स... अशा प्रयोगांमुळे पुस्तकांचे विश्व मुलांना खुणावू लागले आहे.
आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन म्हणजेच 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस आनंदात साजरा केला जाणार असून, त्यानिमित्ताने दै. ‘पुढारी’ने लहान मुलांना वाचनाकडे वळविण्यासाठी होणाऱ्या नवीन प्रयोगांविषयी जाणून घेतले.
कथांचे, कवितांचे जग, विज्ञानातील गमती-जमती, माहितीपर पुस्तके, क्रीडा, नृत्य, कला, महापुरुषांच्या प्रेरणादायी कथा, अशा विविध विषयांवरील पुस्तकांमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. त्यामुळे लहान मुले प्रामुख्याने रंगीत चित्रांचा समावेश असलेली पुस्तके खरेदी करीत असून, पालकही मुलांना पुस्तक विकत घेऊन वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
प्रकाशक घनश्याम पाटील म्हणाले, बालसाहित्याच्या दुनियेत खऱ्या अर्थाने नवीन प्रयोग सुरू झाले आहेत. बालसाहित्याची निर्मिती वाढली असून, एआयद्वारे तयार केलेली चित्रे असो वा लहान मुलांना भावतील, आवडतील अशा विषयांवरील पटकन वाचून होतील अशा छोट्या पुस्तकांचीही निर्मिती होत आहे. आम्हीही असे वेगवेगळे प्रयोग करीत आहोत. लहान मुलांसाठी दिवाळी अंक प्रकाशित करण्यासह लहान मुलांच्या पुस्तकातही प्रामुख्याने अधिकाधिक प्रमाणात रंगीत चित्रांचा समावेश करीत आहोत. त्यासाठी एआयचीही मदत घेत आहोत. पुस्तकांमध्ये चित्रे असल्याने मुले पुस्तकवाचनाकडे आकर्षित होत आहेत.
स्वत:ला ओळखण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे वाचन. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि नव्याने विकसित झालेल्या एआयसारख्या माध्यमांचा पुस्तक आणि वाचन व्यवहारांमध्ये सकारात्मक वापर होत आहे. त्याचदृष्टीने नवनवे प्रयोग होत असून, या प्रयोगांमुळे मुले वाचनाकडे वळत आहेत.प्रसाद भडसावळे, ग्रंथप्रसारक