बावडा: एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मुलाने वडिलांचे सुमारे 50 वर्षांपासूनचे तंबाखूचे व्यसन सोडविले आहे. लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील 70 वर्षीय व्यक्तीचे तंबाखूचे व्यसन सुटावे म्हणून त्यासाठी त्यांचा मुलगा व नातू यांनी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला आहे.
सदाशिव अण्णा ढोले असे तंबाखूचे व्यसन सुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एआय तंत्रज्ञान हे कठीण समस्यांवरही उत्तर शोधते, या जाषणवेतून मुलगा दादासाहेब ढोले व नातू श्रेयस यांनी तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी एआयला कामाला लावले. (Latest Pune News)
दादासाहेब ढोले यांनी सांगितले की, वडिलांना कितीही समजून सांगितलं तरी ते व्यसन सोडायला तयार नव्हते. वडिलांना बीपी व शुगरचा त्रास होता. ते गेल्या 20 वर्षांपासून नियमित औषधोपचार घेत आहेत. त्यांना समुपदेशनाची गरज होती. वडिलांचे तंबाखूचे व्यसन खूप प्रमाणात वाढत होते, ते नेहमी खटकत होते, तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी होती.
याकामी दादासाहेब ढोले यांना इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व उपयोगी आले. त्यांनी तंबाखूच्या व्यसनाबाबत एआयच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळवली. इंग्रजी भाषेमधील समुपदेशन मराठीत भाषांतर करून त्यांनी वडिलांना ऐकवले. त्यातून शुगर व बीपीच्या रुग्णाला तंबाखूसारखे व्यसनाचा आणि त्यामध्ये असलेल्या निकोटीनचा दुष्परिणाम समजावून सांगण्यात आला.
एआयने फक्त भावनांवर अवलंबून न राहता, तंबाखूमधील निकोटीनचे बी. पी. आणि शुगरवर होणारे दुष्परिणाम वैज्ञानिक माहितीच्या आधारे वडिलांना समजावून सांगितले. यामुळे वडिलांना त्याचे गांभिर्य लक्षात आले. सर्व माहिती पटल्यामुळे वडील सदाशिव ढोले यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे मान्य केले. व्यसन सोडवण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, असेही दादासाहेब ढोले यांनी नमूद केले.