नारायणगाव: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. 9) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटला भेट दिली. एवढेच नाही, तर त्यांनी एका शेतकर्याच्या टोमॅटोची बोली देखील लावली. या शेतकर्याची टोमॅटोची बोली चक्क सत्तर रुपये किलोने झाली. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाल्याने त्याला 70 क्रेटचे 90 हजारांहून अधिक रुपये मिळाले.
कृषिमंत्री भरणे यांचा बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती प्रीतम काळे यांनी सत्कार केला. या वेळी बाजार समितीचे संचालक तसेच ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, गुलाब नेहरकर विनायक तांबे, ईश्वर गायकर, धोंडीबा नेरकर, सारंग घोलप, अमित दांगट उपस्थित होते. या वेळी व्यापार्यांनी देखील कृषिमंत्र्यांचा सत्कार केला. (Latest Pune News)
भरणे म्हणाले की, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची बोली लावण्याचा मान मिळाला याचा शेतकरी म्हणून अभिमान आहे. सध्या गावठी टोमॅटोला अधिक प्रमाणात मागणी आहे. भविष्यकाळात शेतकर्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतले जातील. शेतकर्याचा मुलगा असल्याने शेतकर्यांच्या अडीअडचणी, व्यथा माहीत आहेत. भविष्यकाळात शेतकर्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा कृषिमंत्री म्हणून प्रयत्न राहील. शेतीमालाला अधिकाधिक बाजारभाव मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.