बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशात 731 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातील 50 केंद्रे महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहेत. परंतु, जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबविले जातात. जगभरातील तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचवली जाते. या केंद्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असल्याचे मत कर्नाटकचे कृषिमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांनी व्यक्त केले. येथील चांगल्या बाबी कर्नाटकातील शेतकर्यांसाठी राबवू, असेही त्यांनी सांगितले.
येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक 2024 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, अॅग्री पायलट कंपनीचे संस्थापक प्रशांत मिश्रा, मंदार कुलकर्णी, सपना नौरिया, रश्मी दराड, विजय शिखरे, दिलीप झेंडे, डॉ. स्वामी रेड्डी, एस. के. राव आदींची या वेळी उपस्थिती होती. चेलुवरयास्वामी यांच्या हस्ते येथे देशातील पहिल्या फार्म ऑफ द फ्यूचरचे उद्घाटन पार पडले.
चेलुवरयास्वामी म्हणाले, कर्नाटकात 33 कृषी विज्ञान केंद्रे आहेत. कर्नाटकातील बेळगावीचे केंद्र खा. पवार यांच्यामुळेच उभे राहू शकले. मथीकोपा येथील केंद्राचे उद्घाटन खुद्द पवार यांनी केले. त्यांनी कृषिमंत्रिपदाच्या कालावधीत देशाच्या कृषी क्षेत्रात मोठे काम केले. परिणामी, अन्नधान्य आयात क?णारा देश निर्यातदार बनला. जगभरातील नवनवीन तंत्रज्ञान बारामतीत राबविले जात असून, शेतकर्यांसाठी ते दिशादर्शक असल्याचे चेलुवरयास्वामी यांनी सांगितले. खा. शरद पवार, सुळे, ट्रस्टचे विश्वस्त प्रताप पवार, डॉ. जावकर, डॉ. मिश्रा यांचीही या वेळी भाषणे झाली. प्रास्ताविकात ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केंद्राच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला.
इंदिरा गांधी ते राहुल गांधींपर्यंतच्या कार्यकाळात देशातील शक्तिशाली राष्ट्रीय नेतृत्व म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते. देशपातळीवर संरक्षण व कृषिमंत्री म्हणून त्यांनी भरीव काम केले. देशातील सर्व राजकीय पक्षांकडून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. एक वादातीत व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कामामुळेच सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडू शकले. देशातील नवीन कृषिमंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत, या शब्दांत कर्नाटकचे कृषिमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.
हेही वाचा