पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या अनपेक्षितपणे करण्यात आलेल्या बदलीला पुण्यातील विविध घटकांकडून कडाडून विरोध होत आहे. ढाकणे यांची बदली झाल्याचे समजताच नागरिकांनी या बदलीविरोधात आंदोलन करीत बदली रद्द करण्याची मागणी केली. भारतीय रेल्वेसेवेतील विकास ढाकणे यांची वर्षभरापूर्वी प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी, त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये दीड वर्ष याच पदावर काम केले होते. पुणे महापालिकेत रुजू झाल्यानंतर ढाकणे यांची झोकून देऊन काम करण्याची पद्धत, नागरिकांचे शांतपणे ऐकून त्यावर कृतीतून समाधान करण्याची पद्धत, यामुळे ते सर्वसामान्यांच्या कसोटीवर खरे उतरले.
अशातच मंगळवारी संध्याकाळी उशिरा निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ढाकणे यांची अनपेक्षितपणे बदली झाल्याने सर्वांनाच धक्का बदला. त्यांच्या बदलीचे वृत्त समजताच महापालिकेतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांकडून हळहळ व्यक्त होऊ लागली. या बदलीचे पडसाद बुधवारी शहराच्या विविध भागांत पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी विमाननगर, केशवनगर तसेच महापालिका भवनसमोर बदलीविरोधात आंदोलने केली. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सामाजिक कार्यकर्त्या श्वेता संग्राम होनराव-कामठे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ढाकणे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्याची बदली रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा