Maharashtra Assembly Polls: मैत्रीपूर्ण लढतीच्या नाट्यावर अखेर पडदा; धनकवडे, मुळीक यांची माघार Pudhari
पुणे

Maharashtra Assembly Polls: मैत्रीपूर्ण लढतीच्या नाट्यावर अखेर पडदा; धनकवडे, मुळीक यांची माघार

अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत दबावतंत्राचा खेळ

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांत महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीच्या दबावतंत्राचा खेळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरपर्यंत चांगलाच रंगला. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर खडकवासला मतदारसंघातून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांनी अर्ज न भरताच माघार घेतली.

त्यामुळे या मैत्रीपूर्ण लढतीच्या नाट्यावर पडदा पडला. महायुतीत वडगाव शेरी मतदारसंघावरून चांगलीच रस्सीखेच रंगली. विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहणार, असे स्पष्ट होते. असे असतानाही माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या जागेवर निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना ग्रीन सिग्नल असल्याचे सांगितले जात होते.

मात्र, अखेर दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आमदार टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही मुळीक निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार का? याकडे लक्ष लागले होते.

मुळीक यांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आणि भाजपकडे असलेल्या खडकवासला मतदारसंघात माजी महापौर धनकवडे यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना सोमवारी रात्री देण्यात आल्या. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील तिढा वाढला. मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या.

सकाळी अकरापर्यंत मुळीक हे उमेदवारी अर्ज न भरण्याच्या निर्णयापर्यंत पोहचले होते. मात्र, अचानक त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अर्ज भरण्याबाबत फोन आला, तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघातही धनकवडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहचले. मात्र, मुळीक आणि धनकवडे या दोघांनी अर्ज न भरता केवळ त्या ठिकाणी थांबून राहण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या घडामोडी जाणून घेऊन दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, धनकवडे यांना अखेर उमेदवारी अर्ज भरू नये, अशा सूचना त्यांच्या पक्षाकडून आल्या, तर इकडे मुळीक यांनाही फडणवीस यांनी फोन करून अर्ज न भरता महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्यामुळे धनकवडे आणि मुळीक दोघेही अर्ज न भरता कार्यालयातून बाहेर पडले.

मुळीकांना फडणवीसांचे आश्वासन

मुळीक यांना अर्ज न भरण्याच्या सूचना केल्यानंतर फडणवीस यांनी मोबाईलवरूनच उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाचा एबी फॉर्म असताना महायुतीचा धर्म पाळायचा असल्याने पक्षाचा आदेश म्हणून मुळीक यांनी एक शिस्तप्रिय सैनिक म्हणून तो आदेश पाळला. त्यांना विधिमंडळात नेण्याची माझी जबाबदारी असून, ती नक्की पूर्ण केली जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT