पुणे ; पुढारी वृत्तसेवा प्रेमप्रकरणातील ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करून मारहाण करत गालाचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रियकरावर मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दानीश नायर (वय.22,रा. ससाने नगर हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत (21 वर्षीय) तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 मार्च रोजी उंड्री तसेच दोराबजी मॉल परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र सद्या दोघांचा ब्रेकअप झाला असून, त्यांच्यात वाद सुरू आहेत. 31 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादींना हाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच त्यांना पाहून घेण्याची धमकी देऊन मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.
यावेळी आरोपी तरुणाने फिर्यादींच्या गालाचा चाव घेऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी तरूणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.