पुणे

नव्या महामर्गामुळे पुणे – बंगळूरू आता अवघ्या तीन तासांत

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नव्याने तयार करण्यात येणार्‍या रस्त्यामुळे पुणे ते बंगळूरूचे अंतर अवघ्या तीन तासांत पूर्ण करता येणार आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि.14) डोणजे येथे केले.

डोणजे- गोळेवाडी येथील आपलं घर संकुलात 'स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशन'च्या श्रीमती कौशल्या कराड ग्रामीण धर्मार्थ रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सेवांकुर संस्थेचे संस्थापक डॉ. श्री. अश्विनीकुमार तुपकरी, आपलं घरचे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, आपलं घरचे प्रमुख विजय फळणीकर, आ. भीमराव तापकीर, माजी खासदार प्रदीप रावत, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे उपस्थित होते.
'फळणीकर नागपूरचे तर साधनाताई भंडार्‍याच्या, दोघांनी जनसेवेला वाहून घेतले. दानशूर व्यक्ती, संस्था मदतीला धावल्या. समाजाच्या सेवेतून मानवतेच्या भिंती उभारण्यात याव्यात,'असे गडकरी यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार परांजपे यांनी केले.

मंत्री हा कायदा मोडण्यासाठीच…

डोणजे- गोळेवाडी येथील दीड किलोमीटर अंतराचा रस्ता आपल्या नियमात बसत नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितल्यावर मंत्री हा कायदा मोडण्यासाठीच असतो, असे मिश्किलपणे बोलत गडकरी म्हणाले, याचा वेगळा अर्थ घेऊ नका, गोरगरिबांच्या हितासाठी दहा वेळा कायदा मोडला तरी चालेल, असे महात्मा गांधी यांनी सांगितले आहे. मात्र, श्रीमंत आणि धनदांडग्यांच्या हितासाठी कायदा मोडू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रतन टाटा स्वतः विमान चालवत आले

औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी रतन टाटा यांना बोलविण्याचे ठरले होते. तेव्हा मी महाराष्ट्रात मंत्री होतो. त्यावेळी मुकुंदराव पळशीकर हे संघाचे मोठे प्रचारक होते, त्यांनी मला सांगितले की नितीन काही कर या रुग्णालयाचे उद्घाटन रतन टाटा यांच्या हस्ते झाले पाहिजे. मी रुग्णालयाचे डॉक्टर पंढरी यांना घेऊन रतन टाटांकडे गेलो. त्यांना म्हणालो की, तुम्ही रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी यावे, अशी इच्छा आहे. 'मैं आपको तो कभी ना कह सकता', असे सांगून त्यांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते स्वत: विमान चालवत औरगाबादला आल्याचा प्रसंग यावेळी गडकरी यांनी सांगितला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT