पुणे : नियमांचे उल्लंघन करणे, अल्पवयीन मुलांना मद्य पुरविणे, वेळेची मर्यादा न पाळणे यासह विविध कारणांमुळे आत्तापर्यंत 63 मद्यालयांना टाळे ठोकले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. कल्याणीनगर येथील अपघातानंतर ही कारवाई करण्यात आली. अपघातानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. मद्यविक्री करणारी दुकाने, मद्यालये, पब यांमध्ये नियमांचे पालन करण्यात येते किंवा कसे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या मोहिमेंतर्गत नियमांचे पालन न करणार्या मद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याला डॉ. दिवसे यांनी मान्यता दिल्याने टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. दिवसे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 19 मद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त झाला होता. त्यानुसार आदेश काढण्यात आले. तसेच चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 63 मद्यालयांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे गेल्या आणि चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 82 मद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणखी काही प्रस्ताव असल्यास त्याची पडताळणी करून कारवाईचे आदेश काढण्यात येतील.
हेही वाचा