पुणे

कोरोनानंतर पुन्हा लग्नाचा डामडौल वाढला; भव्य-दिव्य सोहळ्यांचे आयोजन करत लाखो रुपयांचा चुराडा

अमृता चौगुले

राजेंद्र गलांडे

बारामती : मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे लग्नसोहळे अतिशय साध्या पद्धतीने पार पडले. आता हे संकट दूर होत असतानाच पुन्हा लग्नाचा डामडौल वाढला असून, यावर लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. भव्य-दिव्य सोहळ्यांचे आयोजन केले जात असल्याचे चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोरोनाकाळात अवघ्या पन्नास जणांच्या उपस्थितीत होणारी लग्ने आता हजारोंच्या साक्षीने पार पडत आहेत. साध्या पद्धतीच्या लग्नांना फाटा दिला जात आहे.

दुसरीकडे लग्नपत्रिका नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लग्नमंडप, साखरपुडा, हळदी समारंभ, नवरदेवाची मिरवणूक, लग्नानंतर आयोजित केला जाणारा स्वागत समारंभ, या सगळ्याच कार्यक्रमांनी रूप पालटले. साखरपुड्याला 20 ते 25 महिलांच्या हस्ते वधूला औक्षण करणार्‍या महिलांना मान म्हणून भेटवस्तू वाटप केले जात आहे. विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार्‍यांचा मानसन्मान केला जात आहे.बारामती तालुका तसा सधन आणि बागायती असल्याने येथेही पुण्या-मुंबईप्रमाणेच लग्नात खर्च केला जात आहे.

घरासमोरील आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात किंवा रंगीबेरंगी कापडांच्या मंडपात पार पडणारी लग्नकार्ये आता मंगल कार्यालये, लॉन्सवर होत आहेत. तेथे भव्य सेट, विद्युतरोषणाई, डिजिटल स्क्रीन, शूटिंगसाठी क्रेनचा वापर असे स्वरूप दिसू लागले. लग्नसमारंभाच्या वेळी मान्यवरांचे स्वागत, जावईबापूंचा सन्मान, वधू-वरांना दुचाकी, चारचाकी भेट, अशा अनेक गोष्टींनी लग्नसमारंभ साजरे होऊ लागले आहेत. लॉन्समध्ये मोठ्या दिमाखात होणारे लग्नसोहळे इव्हेंट म्हणून पार पडू लागले आहेत.

अनेकांना मिळतोय रोजगार

लग्नसोहळ्यांवर अवलंबून असलेले मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, स्पीकर सेट, ढोल-लेझीम, बँडपथक, फोटोग्राफर, घोडेवाला, वाजंत्री, डीजे, आचारी, वाढपी, हार-फुले व्यावसायिक, वर्‍हाड घेऊन जाणारे टेम्पो-चारचाकी वाहने आदींची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत घरघर लागलेल्या या छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत ते समाधान व्यक्त करीत आहेत.

लग्नपत्रिका नामशेष होण्याच्या मार्गावर

अनेक पिढ्यांपासून चालत आलेली लग्नपत्रिका डिजिटल युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सोशल मीडियावर वधू-वरांचे फोटो टाकून लग्न वेळ आणि ठिकाणाचा उल्लेख करीत नातेवाइकांना मोबाईलवर पत्रिका पाठवली जात आहे. स्पर्धेच्या युगात लग्नपत्रिका पोहचविण्याचे काम मोबाईल करीत असल्याने वेळ आणि पैसे वाचत आहे. यामुळे पारंपरिक पत्रिका नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

SCROLL FOR NEXT