पुणे

‘एएफएमसी’चा राष्ट्रपतींकडून सन्मान; प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सशस्त्र सेनादल वैद्यकीय महाविद्यालयाने (एएफएमसी) संशोधनासाठी नव्या साधनांचा उपयोग करावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा अमृत महोत्सव (75 वा वर्धापनदिन) शुक्रवारी थाटात साजरा झाला. या वेळी महाविद्यालयला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी 'प्रज्ञा' या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे शहरातील कॅम्प भागात एएफएमसी ही संस्था आहे. लष्करातील डॉक्टर येथे घडवले जातात. तसेच लष्करासाठी खास वैद्यकीय संशोधन येथे होते. या संस्थेच्या अमृतमहोत्सवाची सांगता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी या ठिकाणी शिक्षण घेणा-या तिन्ही दलांच्या कॅडेट्सनी बहारदार संचलन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संस्थेला विशेष चिन्ह प्रदान करण्यात आले.

कामगिरी अभिमानास्पद

या प्रसंगी राष्ट्रपतींनी भाषणात सांगितले की, या संस्थेतून पदवीधर झालेल्यांनी युद्धाचा काळ, बंडविरोधी कारवाया, नैसर्गिक आपत्ती तसेच महामारीच्या काळात, देशांतर्गत तसेच सीमापार भागात समर्पितपणे सेवा देऊन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. एएफएमसीमधून पदवी मिळवलेल्या अनेक महिला सैनिकांनी सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
एएफएमसीने वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च गुणवत्ता असलेली संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रिसिजन मेडिसिन, त्रिमितीय छपाई, टेलीमेडिसिन आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर होताना पाहतो आहोत. सैनिकांना तंदुरुस्त तसेच युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्यात सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. संस्थेने आता वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर अधिक भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

सैनिकांच्या वैद्यकीय चाचण्या काही मिनिटांत

दुर्गम भागात देशाच्या सीमेचे रक्षण करणा-या सैनिकांच्या वैद्यकीय चाचण्या व अहवाल आता काही मिनिटांत मिळतील. यासाठी आम्ही कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर लवकरच करणार असल्याची माहिती सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालयाचे (एएफएमसी) दिल्ली येथील महासंचालक डॉ. दलजितसिंग यांनी दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रज्ञा या संगणकीय उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत एएफएमसीचे महासंचालक डॉ. दलजित सिंग यांनी सांगितले की, आपल्या देशात मधुमेह, रक्तदाब तसेच लिपीड प्रोफाईल वाढणा-यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सैनिकांचे आरोग्य राखणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी पुण्यातील एएफएमसीमध्ये प्रज्ञा या संगणकीय उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार

दलजितसिंग म्हणाले, आपल्या देशात अनेक ठिकाणी दुर्गम भाग आहेत. जेथे वैद्यकीय चाचण्या करणे कठीण आहे. त्यासाठी आता कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करून त्या सैनिकांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पुण्यातील या संगणकीय केंद्रातून करता येणार आहेत. एक्स-रे, एमआरआय, रक्ताच्या विविध चाचण्यांचे रिपोर्ट त्यांचे अहवाल इथून करून पाठवता येतील, जेणेकरून आजारी सैनिकाच्या आजाराचे निदान वेगाने करता येईल.

कोणत्याही विषाणूची भीती नाही

कोरोना काळात एएफएमसीने सैनिकांसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता जिनोमसिक्वेन्सिंग वेगाने होत असल्याने कोणत्याही विषाणूची भीती नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT