पुणे : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद आता इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. नव्या मार्गामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असली, तरी हाताळणी कमी झाल्याने दर्जेदार सफरचंद बाजारात उपलब्ध होत आहेत. घाऊक बाजारात त्याच्या दहा किलोला 900 ते 1100 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात सर्व सफरचंदांची 160 ते 320 रुपये किलो दराने विक्री होत आहे.(Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात देशासह परदेशातून सफचंंद दाखल होत आहेत. यंदा हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा फटका येथील सफरचंदांच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, देशी सफरचंदांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यात पोषक वातावरणामुळे अफगाणिस्तान येथील सफरचंदांचा हंगाम पंधरा दिवस अगोदर सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डात दर्जेदार अफगाणी सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहेत. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात दहा किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. लाल जर्द आणि कोणतीही वॅक्सीन प्रक्रिया केलेली नसल्याने या सफरचंदांना पुणेकरांची पसंती मिळत असल्याची माहिती गुरुदत्त इम्पॅक्टचे संचालक व आयातदार शिवजित झेंडे यांनी दिली.
अफगाणिस्ताने येथून रस्त्याने सफरचंद इराणमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर इराण येथून समुद्रमार्गे ते मुंबई येथे व तेथून देशभरात जात आहेत. रस्तेमार्गाने होणारी फळांची हाताळणी कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंदांची गुणवत्ता टिकण्यास मदत झाली आहे. मात्र, समुद्रामार्गे वाहतूक होत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, गतवर्षी दहा किलोला 800 ते 900 रुपये मिळणारा दर यंदा 900 ते 1 हजार 100 रुपयांवर पोहचला असला आहे.
सफरचंद वजन घाऊक दर
काश्मीर 14 ते 16 किलो 1000 ते 1400
किन्नोर 10 किलो 1600 ते 1800
अफगाणी 10 किलो 900 ते 1100
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीसाठी दाखल झालेले सफरचंद.