पुणे : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
निंबाळकर हे १९८४ पासून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. ते पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, २००४ पासून परिषदेत निवडून आलेले सदस्य आहेत. जुलै २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून पदनाम दिले आहे. हे पदनाम मिळवणारे ते पुण्यातील पहिले वकील ठरले आहेत.
वकिलांच्या हितासाठी त्यांनी अनेक परिषदांचे, चर्चासत्रांचे आणि प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले आहे. तरुण वकिलांसाठी मार्गदर्शन, ज्येष्ठ वकिलांच्या प्रश्नांवर तोडगा आणि बार–बेंच संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यापूर्वी परिषदेच्या अध्यक्षपदी ॲड. अहमद खान-पठाण यांची नियुक्ती झाली होती.