Aditya Thackeray will adopt the city of Pimpri-Chinchwad on the lines of Mumbai 
पुणे

मुंबईच्या धर्तीवर आदित्य ठाकरे पिंपरी-चिंचवड शहर दत्तक घेणार

backup backup

शिवसेना संपर्क नेते सचिन आहिर यांची माहिती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

झपाट्याने वाढत असलेले आणि कॉस्मोपोलिटीन पिंपरी-चिंचवड शहराचा मुंबईच्या धर्तीवर विकास करण्यासाठी हे शहर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दत्तक घेणार आहेत.

त्या दृष्टीने शिवसेनेने नियोजन करून तयारी केली आहे, असे शिवसेना संपर्क नेते सचिन आहिर यांनी गुरुवारी सांगितले.

ते पत्रकारांशी बोलत होते. आहिर म्हणाले की, वाढते शहर तसेच, आजूबाजूची गावे यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात महापालिका तसेच, सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.

येथील लोकांच्या शहराबाबत असलेल्या अपेक्षा विचार करून एरिया लोकल मॅनेजमेंट (एएलएम) वर पक्षाने फोकस केला आहे. त्या माध्यमातून प्रभाग, गल्ली, वस्ती, हाउसिंग सोसायटी संदर्भात नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन मायक्रो प्लॅनिंग केले आहे.

त्यात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा, नदी स्वच्छता, पर्यावण संवर्धन, प्रदूषण रोखणे आदींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आले आहे. तो पर्याय घेऊन आगामी निवडणुकीसाठी शिवसेना नागरिकांसमोर जाणार आहे.

निवडणुकीसाठी स्थानिक चेहरा न देता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांचा चेहरा असणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडचा विकास केला जाणार असून, त्यासाठीच आदित्य ठाकरे पिंपरी-चिंचवड शहर दत्तक घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

सोबत आल्यास आघाडी, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व काँग्रेस आमच्यासोबत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी जो पक्ष ज्या ठिकाणी मोठा आहे, त्यांनी पुढाकार घेऊन आघाडीबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड व पुण्यात राष्ट्रवादीने चर्चेसाठी प्रथम पाऊल टाकणे आवश्यक आहे. आघाडी करणार किंवा नाही हे त्यांनी चर्चा करून स्पष्टपणे सांगावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, असे सचिन आहिर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी सक्षम आहे. कोरोना महामारीत सक्षमपणे काम करणारे मुख्यमंत्री अशी प्रतिमा उद्धव ठाकरे यांची झाली आहे. आदित्य ठाकरे यांना पर्यावरणातील कामाबाबत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

त्यांचा चेहरा घेऊन आम्ही नागरिकांसमोर जाणार आहोत. महिला आघाडी तसेच युवा आघाडीच्या नव्या व सर्वसामान्य चेहर्‍यांना संधी दिली जाईल. त्यांना पक्ष बळ देईल. दुसर्‍या पक्षातून आलेल्यांना आम्ही स्वीकारणार नाही, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहरात भ्रष्टाचारावर रान पेटविणार

नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार हा मुख्य मुुद्दा असणार आहे. पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे.

तसेच, युवा नेते आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांचे एकदिवशीय दौरे आयोजित केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील पक्षा संघटनाबाबत आदित्य शिरोडकर यांनी अहवाल तयार केला आहे. तो लवकरच सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT