पुणे: जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाने अखेर कारवाई केली आहे. कुऱ्हाडे यांची खडकवासला पाटबंधारे विभागातून तातडीने बदली करावी, बदली होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अथवा पुणे पाटबंधारे मंडळ विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण उपविभागात त्यांची नियुक्ती करावी, असे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विशेष अधीक्षक शाम हिंगे यांनी काढले आहेत.
याबाबत महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या मनमानी आणि असंवेदनशील कामकाजाबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळ, तसेच जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. (Latest Pune News)
खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणाच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, मनमानी, बेशिस्त कारभार आदी तक्रारी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार केलेल्या चौकशीत या तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्यावर उचित कारवाई करण्याबाबत शिफारस केल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विशेष अधीक्षक शाम हिंगे यांनी पत्रात म्हटले आहे.
104 पानांचा अहवाल
कृष्णा खोरे महामंडळाने कुऱ्हाडे यांच्यावरील तक्रारींची छाननी केली. चौकशीत तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. महामंडळाने याबाबत तब्बल 104 पानांचा अहवाल तयार केला आहे. वारंवार तक्रार करूनही अनेक महिन्यांपासून कुऱ्हाडे यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन टाळाटाळ करत होते. याच्या निषेधार्थ जलसंपदा विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वरिष्ठ पातळीवर कारवाईबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या.
माझ्याविरोधात वरिष्ठांनी मिळून बनावट तक्रारी केलेल्या आहेत. त्याची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे. हे माझ्या विरोधात रचलेले षड्यंत्र आहे.- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे