पुणे

‘रेलरोको’प्रकरणी पाच आंदोलकांवर कारवाई अन् जामिनावर मुक्तता

Laxman Dhenge

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भिगवण रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील पाच पदाधिकार्‍यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, सायंकाळी या सर्वांची वैद्यकीय तपासणी करीत गेट जामिन करून त्यांची सुटका करण्यात आली. या मध्ये बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, तत्कालीन सरपंच तानाजी वायसे यांच्यासह, प्रा. तुषार क्षीरसागर, जावेद शेख, ग्रामसदस्य कपिल भाकरे यांचा समावेश आहे. अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनेक आंदोलनकर्ते धास्तावले होते. कोरोना काळापूर्वी भिगवण रेल्वे स्टेशन येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता. कोरोनाकाळात या सर्वच गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. याचा परिणाम या भागातील रेल्वे प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात झाला होता.

एक्सप्रेस गाड्या थांबत असल्याने भिगवण व परिसरातील पंधरा ते वीस गावातील नोकरदार, कंपनीतील कामगार, विद्यार्थी अशा अनेक प्रवाश्यांना रेल्वे प्रवास सोयीचा ठरत होता. त्याचप्रमाणे येथील अनेकांना रोजगार उपलब्ध होत होता. एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी सातत्याने रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. मात्र, तरीही थांबा पूर्ववत होत नसल्याने 24 फेब्रुवारी रोजी भिगवण रेल्वे स्टेशन येथे नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही लोकांवर गुन्हे दाखल
केले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी तानाजी वायसे, कपिल भाकरे, जावेद शेख या तिघांना ताब्यात घेतले व दुपारनंतर पराग जाधव व प्रा. तुषार क्षीरसागर यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईची माहिती समजताच इतर पदाधिकारी टेन्शनमध्ये आले होते. सायंकाळी या सर्वांची मेडिकल तपासणी करून गेट जामिन करून त्यांची सुटका करण्यात आली.

जनहितासाठी आंदोलन केले होते. अनेक दिवसांची प्रवाशी, नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी यांची एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्याची मागणी होती. त्यामुळे गुन्हे दाखल केल्याची अजिबात खंत नाही. जनहितासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढेही लढत राहू.

पराग जाधव, माजी उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT