पिंपरी : पंकज खोले : बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून फट् फट् आवाज करणार्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दोनशेहून अधिक जणांवर कारवाई करून दंड ठोठावण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्तालयातील 12 वाहतूक शाखांच्या माध्यमातून, तर गेल्या दोन दिवसांत 205 दुचाकी वाहनचालकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
त्यात काही वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. ते पोलिसांनी जमा केले आहेत. दंडात्मक कारवाई करून त्यांना पुढच्या वेळी अशा पद्धतीचे सायलेन्सर न लावल्याबाबत ताकीदही देण्यात आली आहे.
रस्त्यावर दुचाकी वाहनांना विशेषतः बुलेट वाहनाच्या मूळ स्वरुपात बदल केला जात असल्याने ते कायद्याच्या विरोधात आहे. बुलेट वाहनाला मोठया आवाजातील सायलेन्सर बसवून त्याचा आवाजामुळे इतर वाहनचालक व नागरिकांना त्रास होतो; तसेच, रात्रीच्या वेळी त्यातून फटाक्यासारखा आवाज काढत बुलेट वाहनचालक गाडी दामटतात.
याबाबतच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. यापूर्वी वाहतूक शाखेला 18 ऑक्टोबर 2020 मध्ये कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. शहरातील वेगवेगळया शाखेत विशेष पथकाच्या वतीने ही कारवाई येथून पुढे सुरु राहणार आहे.
शहरातील वाहतूक पोलिसांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात अडीच हजारांहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.
त्या माध्यामातून 25 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मध्यंतरी ही कारवाई थांबली होती. मात्र, वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांना आलेल्या तक्रारीनंतर पुन्हा ही धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरात बोकाळलेल्या अवैध व धोकादायक वाहतुकीवर वाहतूक पोलिसांनी बडगा उगारला आहे. धोकादायक वाहतुकीच्या माध्यमातून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. चौकामध्ये कोणाताही नियम न पाळून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अशा वाहनांवर दोन दिवसांत 61 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील जुन्या पुणे-मुंबई मार्गासह विविध प्रमुख चौकांत ही कारवाई करण्यात आली. त्या वाहनधारकांना पुढे अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत सूचना केल्या.वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहनात कोणताही परस्पर बदल करू नये. येथ्ाून पुढे अशी कारवाई सुरू राहणार आहे.
– नंदकिशोर भोसले पाटील, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग