पुणे

Pune News : एसीपी सिव्हिल ड्रेसमध्ये कोर्टात; न्यायालयाने बजावली नोटीस; नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना न्यायालयात हजर करणार्‍या तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांना सोमवारी (दि. 16) न्यायालयाने शिस्तभंगाची नोटीस बजावली. न्यायालयीन कामकाजावेळी पोलिसांनी गणवेशातच हजर राहाणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, तांबे साध्या वेशात न्यायालयात आले. त्यावर न्यायालयाने तांबे यांच्यावर नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची नोटीस बजावली.

न्यायालयामार्फत पाठविलेल्या नोटिशीबाबत लेखी खुलासा शहर पोलिस आयुक्तांमार्फत पंधरा दिवसात सादर करावा. तसे न केल्यास न्यायालय शिस्तभंग प्राधिकार्‍याकडे अहवाल पाठवेल असे न्यायालयाने नोटीसमध्ये म्हटले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ही नोटीस पाठविली आहे. न्यायालयात तांबे आले असताना न्यायालयाने त्यांना गणवेशामध्ये का आला नाहीत? असे विचारले असता तांबे यांनी पुढच्या वेळी काळजी घेईन असे सांगितले. पण न्यायालयाला हे उत्तर समाधानकारक वाटले नाही. तांबे यांनी नियमांचे उल्लंघन आणि भंग केला हे त्यांचे कृत्य इतर पोलिस संवर्गांसाठी नक्कीच अनुकरणीय नाही.

न्यायालयीन कामकाजावेळी उपस्थित राहण्याचे पोलिसांवर कायदेशीर बंधन आहे. तसे न केल्याने केवळ पोलिस खात्याच्याच नव्हे तर न्यायालयाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेस बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करणार्‍या या कृत्यास गैरवर्तन आहे असे समजून शिस्तभंग प्राधिका-याकडे अहवाल का पाठविण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात शहर पोलिस आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा असे नोटीसमध्ये नमूद आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT