पुणे : बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील २५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने १५ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. येवलेवाडी परिसरातून अटक केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.12) दुपारच्या सुमारास शिवाजीगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी, सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवाद केला. अॅड. जाधव म्हणाले, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे.
गुन्हयात वापरण्यात आलेले एक हत्यार तसेच वाहन जप्त करायचे आहे. गुन्ह्यादरम्यान आरोपींनी पिडीतांकडे असलेली चैन चोरली असून ती जप्त करायची आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अन्य साथीदार अद्याप फरार आहे. त्यांच्या ठावठिकाण्याच्या अनुषंगाने आरोपीकडे तपास करायचा असून त्यांना अटक करायची असल्याचे न्यायालयास सांगितले. न्यायालयाने सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.