

बोपदेव घाटात तरुणीला हत्याराचा धाक दाखवून झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटलिजन्स) म्हणजे एआयचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये गोळा करण्यात आलेला डम डेटा विश्लेषणासाठी व अन्य तांत्रिक बाबी तपासण्यासाठी या एआय आधुनिक तंत्रज्ञानाची मदत सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात साडेपाच हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आहे. मागील काही दिवसांत घटनेपूर्वी आणि घटनेनंतर बोपदेव घाटामार्गे गेलेल्या मोबाईल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. घाटापासून 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणार्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सह पोलिस आयुक्त शर्मा यांनी केले आहे.