पुणे

पुणे : गतिरोधक असून अडचण, नसून खोळंबा ; पांढरे पट्टे, सूचना फलक नसल्यामुळे होतात अपघात

अमृता चौगुले

पौड (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : पौड ते कोळवण (ता. मुळशी) रस्त्यावर रस्त्यावर नागरिकांच्या मागणीनुसार केलेले गतिरोधक आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना हा गतिरोधक दिसून येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून केली जात आहे. पौड ते कोळवण दरम्यान पौड हायस्कूल, करमोळी, चाले तसेच इतर ठिकाणी गतिरोधकांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले.

त्यावर तत्काळ पांढरे पट्टे व सूचना फलक लावणे गरजेचे होते. मात्र पांढरे पट्टे मारले नाहीत, तसेच सूचनाफलकही लावले नाहीत. हे गतिरोधक वाहनचालकांना लवकर दिसून येत नाहीत. रात्रीच्या वेळी तर गतिरोधकांचा काहीच अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वाहनचालकांना अपघात झाले आहेत. दुचाकीस्वारांना तर हमखास अपघात होत आहेत. नुकताच पावसाळा सुरू झाला असून, हळूहळू मुळशीत फिरायला येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची पौड ते कोळवण रस्त्याने वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे तत्काळ गतिरोधकांना पांढरे पट्टे व सूचना फलक लावण्याची मागणी केली जात आहे.फ

सुदैवाने जीव वाचला
गॅस सिलिंडर आणण्यासाठी पौड येथे जात होतो. करमोळी येथे केलेले गतिरोधक लवकर समजून आले नाही. त्यामुळे आमच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये आम्ही गंभीर जखमी झालो. सुदैवाने मागून दुसरे कोणते वाहन आले नाही. अन्यथा आमचा जीव गेला असता. दुसर्‍या कोणाचा जीव जाण्याआधी त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारायला पाहिजे, असे अपघातग्रस्त गौरी भालेराव, आतिष भालेराव यांनी सांगितले.

बांधकाम विभागाकडून केलेले गतिरोधक शासकीय नियमाला धरून करायला हवेत. तसेच त्या ठिकाणी गतिरोधकाला पांढरे पट्टे मारणे आवश्यक आहे.
                                               -नामदेव टेमघरे, शिवसेना नेते, काशिग 

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT