पुणे

’आपला दवाखाना’ वर्षभरानंतरही ‘आपला’ नाही : राज्य शासनाची फक्त घोषणाच

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने 'आपला दवाखाना' हा उपक्रम राबवला. मागील वर्षी मे महिन्यात राज्य शासनातर्फे 'आपला दवाखाना' उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मात्र, एक वर्षानंतर महापालिकेमध्ये एकही दवाखाना सुरू झालेला नाही.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मागील काही महिन्यांपासून दवाखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू होते. सुरुवातीला अकरा जागा निवडण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्या- टप्प्याने आणखी जागा ताब्यात घेण्यात आल्या. संबंधित जागामालकांशी भाडेकरारासंदर्भात बैठक झाल्यानंतर जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू झाले. आतापर्यंत 48 ठिकाणी जागांबाबत चर्चा झाली असून, सात जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
औंध- बाणेर, वारजे, सहकारनगर, धनकवडी, कसबा पेठ, भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, नगर रस्ता, येरवडा- कळस- धानोरी अशा सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये दोन किंवा तीन दवाखाने सुरू होणार आहेत. दवाखान्यांचा सर्वाधिक फायदा कष्टकरी, बांधकाम मजूर, विक्रेते यांना होणार आहे. त्यादृष्टीने साधनसामग्री, औषधोपचार आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

आवश्यकतेनुसार सर्व सेवा देणार

झोपडपट्टी परिसरात आणि दुर्गम भागामध्ये राहणार्‍या नागरिकांना तब्येतीच्या लहान तक्रारींसाठी महापालिकेचा दूरचा दवाखाना गाठावा लागू नये, यासाठी वस्त्यांमध्ये 'आपला दवाखाना' सुरू केला जाणार आहे. महिन्यातील एक दिवस ठरवून नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेंतर्गत शहरात 48 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. त्यासाठी सात जागा ताब्यात मिळाल्या असून, पंधरा दिवसांमध्ये दवाखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. येथे नागरिकांना मोफत औषधोपचार उपलब्ध होणार आहेत.
– डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT