पुणेः कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील दोघा पंटरांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोमवार पेठ परिसरातून पिस्तुलासह पकडले. या दोघांनी आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याचा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह आठ जणांच्या विरुद्ध मंगळवारी (दि.2) भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
तालीम आस मोहंमद खान उर्फ आरिफ (वय.24, रा. लोणीकाळभोर), युनूस जलील खान (वय.24, रा. सय्यदनगर हडपसर) अशी दोघांची नावे आहेत. हे दोघे टिपू पठाण टोळीतील सदस्य आहेत. तालीम याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अवैध पद्धतीने मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करून विक्री करतो.
तालीम याच्याकडून गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबत दोघांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार अनिकेत बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 1) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करीत कोयत्याने वार करून खून केला होता.
...असे अडकले जाळ्यात
वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात आंदेकर टोळी असल्याचे समोर आले आहे. सोमनाथ गायकवाड आणि त्याचे साथीदार त्यांच्या निशान्यावर आहेत. अशातच भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच आंदेकर टोळीचा डाव हानून पाडला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाला सोमवार पेठ परिसरात गुंड टिपू पठाण टोळीतील दोघे पंटर तालीम आणि युनूस उभे असून, त्यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे पोलिस कर्मचारी अनिकेत बाबर , निलेश जाधव,ओंकार कुभार, संभाजी सकटे, निलेश साबळे, अमित जमदाडे यांच्या पथकाने सापळ रचून दोघांना पकडले. अंगझडतीत तालीम याच्याकडे गावठी पिस्तूल आणि काडतूसे मिळून आली.
तालीमचे अमन पठाण सोबत संभाषण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि त्यांच्या बहुतांश साथीदारांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. त्यांच्या घराची रेकी करून कट रचल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमन पठाण याच्यासोबत तालीम खान याचे संभाषण झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
तर दुसरीकडे आंदेकर टोळीतील सदस्य दत्ता काळे हा कृष्णा आंदेकर याच्या संपर्कात होता. त्यानेच काळे याला पाच हजार रुपये खोली भाड्याने घेण्यासाठी दिले होते. काळे याने कृष्णाला वनराज यांचा खून करणार्या आरोपींच्या घराची माहिती दिली होती. कृष्णा याने अमनला पाठवून देतो असे काळेला सांगितले होते.
दुसर्या दिवशी कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळे याने यश पाटील याला फोन केला. त्यावेळी त्याने देखील अमन याचे नाव घेतले. त्यानंतर कृष्णाने काळे याला फोन करून पाच वेपन घेऊन पाठविल्याचे सांगितले. तर अमन याने कॉल करून ’लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा’ असे म्हटल्याचे काळे याने पोलिसांना सांगितले आहे.
त्यामुळे तालीम हा अमनच्या संपर्कात, तर कृष्णा याने अमनचा वारंवार केलेला उल्लेख, रेकी करणारा काळे, तसेच पाटील याच्याकडून घेतले जाणारे अमनचे नाव, अमन याने कोणावर लक्ष ठेवून कळवा असे म्हटले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.