Spouses Filing Multiple Legal Cases in Different Cities
शंकर कवडे
पुणे : वैवाहिक आयुष्य जगत असताना पती-पत्नीमध्ये वाद हा ओघाने आलाच. मात्र, काही वेळा वाद इतके टोकाला जातात की ते न्यायालयापर्यंत येऊन पोहचतात. या वेळी साथीदाराला आणि त्याच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल, याद़ृष्टीने मारहाण, विवाहितेचा छळ, कौटुंबिक हिंचासार, नांदायला येण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी, घटस्फोट, अंतरिम पोटगी, विविध कारणांसाठी खर्च मिळण्याबाबत यासह अनेक प्रकारचे दावे दाखल होत आहेत. मागील काही वर्षांत या अर्जांच्या संख्येत वाढ झाली असून, दावे दाखल करताना ते एकाच जागी दाखल न करता मुद्दाम वेगवेगळ्या शहरांत नोंदवले जातात. ज्याद्वारे जोडीदारासह सासरच्यांना जेरीस आणण्याकडेच दाम्पत्यांचा जास्त कल दिसून येतो.
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मागील काही वर्षांत परस्पर संमतीसह एकतर्फी घटस्फोट अर्जांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये, एकतर्फी घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय आहे. पतीने घटस्फोटाची नोटीस पाठविताच पत्नीकडून पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात येतो. याखेरीज, पोटगीसाठी अर्ज, घरात राहण्यासाठी अर्जांचा सपाटा पत्नीकडून सुरू होतो.
बहुतांश प्रकरणात पत्नीकडून सासरच्यांवरही आरोप केले जातात. त्यावर, पतीही पत्नीकडून आई-वडीलांना मारहाण, स्वत: सह कुटुंबियांचा मानसिक छळ करीत असल्याची कारणे देत अर्ज सादर करतो. जोडीदाराला आणखी त्रास द्यायचा असल्यास सासर, माहेर आणि ती किंवा तो तात्पुरते किंवा कायमस्वरूपी राहत असलेल्या ठिकाणी, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण, जिथे काही काळ संसार केला ते ठिकाण पती आणि पत्नी असे दोघेही दावे दाखल करतात, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील अॅड. अमृता मुळे यांनी दिली.
जोडीदारासह कुटुंबियांना त्रास देण्यासाठी अनेक दावे दाखल केले जात आहेत. दावा दाखल करताना तो एकाच जागी दाखल न करता मुद्दाम वेगवेगळ्या शहरात नोंदवले जात आहेत. जेणेकरून साथीदारासह कुटुंबीय चकरा मारून कंटाळले पाहिजेत. त्यातून मानसिक त्रास होईल. विविध अर्जांच्या माध्यमातून पोटगी किंवा देखभाल खर्च लवकर मिळेल. तसेच दाव्यात लवकर तडजोड होईल, या आशाने साथीदारावर मुद्दाम विविध ठिकाणच्या न्यायालयात दावे दाखल केले जात आहेत.
साथीदाराने विविध न्यायालयात दाखल केलेले दावे एकाच ठिकाणी चालवायचे असतील तर त्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले जातात. त्रास देण्याच्या उद्देशाने असे कृत्य करण्यात आले असेल तर न्यायालयात दावेदाराला फटकारून एकाच ठिकाणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले जातात.