पुणे

रन-वेवर विमानाला ट्रॅक्टरची जोरदार धडक..! पुणे विमानतळावरील घटना

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून दिल्लीकडे जाणार्‍या विमानाला पुश बॅक ट्रॅक्टरची (टग ट्रक) रन-वेवरच धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे विमानाला भगदाड पडल्याचे समोर आले आहे. या वेळी विमानातून 180 प्रवासी प्रवास करत होते, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पुणे विमानतळावरून एअर इंडिया कंपनीचे विमान सायंकाळी चार ते सव्वाचारच्या सुमारास दिल्लीकडे झेप घेण्यास सज्ज झाले होते. ते पार्किंगमधून रन-वेवर येत असतानाच प्रवाशांचे सामान वाहून नेणार्‍या पुश बॅक टग ट्रकने धडक मारली अन् या पुणे-दिल्ली विमानाला भगदाड पडले. याची माहिती तत्काळ विमान कर्मचार्‍यांनी विमान अधिकार्‍यांना दिली. विमानतळ प्रशासनाने ही विमानसेवा रद्द केली. प्रवाशांना पर्यायी विमानसेवेची व्यवस्था करून देण्यात आली.

तसेच, या विमानाचा हा अपघात कशामुळे झाला, याची कारणे काय आहेत, याचा तपास करण्यासाठी हे विमान पुणे विमानतळावरच ठेवण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी ही घटना घडली असल्याचे सांगत, घटनेच्या सत्यतेला दुजोरा दिला. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. प्रवाशांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. कशामुळे घटना घडली, याची माहिती एअर इंडियाकडूनच मिळेल. परंतु, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन, डीजीसीए) या विमानाची तपासणी सुरू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT