राजगुरुनगर: गेल्या अनेक महिन्यांपासून राजगुरुनगर शहरातील जुन्या बसस्थानकामागे नियमित भरणार्या बाजारात, दर शुक्रवारच्या आठवडे बाजारात मजूर अड्ड्यालगत टेबल-खुर्च्या टाकून दररोज खुलेआम जुगार अड्डा, सट्टा बाजार भरविला जातो.
बाजारामध्ये सर्वसामान्य लोक, पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी यांना हा जुगार अड्डा, सट्टा बाजार सुरू असल्याचे, पैसे हरल्यावर नियमित वादविवाद, हाणामारीचे प्रकार होत असल्याचे दिसत असताना केवळ चिरीमिरी, हफ्तेखोरीसाठी पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होते. (Latest Pune News)
गेल्या काही वर्षांत चाकणपाठोपाठ राजगुरुनगर शहर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परराज्यातील प्रामुख्याने मजुरीसाठी येणाऱ्या यूपी-बिहारी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजगुरुनगर शहरातील बाजार समितीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दररोज सकाळी हजारो कामगारांचा मजूर अड्डा भरविला जातो.
सायंकाळी हे मजूर कामावरून येण्याची वेळ झाल्यावर बाजाराच्या आवारामध्ये काही लोक टेबल-खुर्च्या टाकून हा जुगार अड्डा, सट्टा बाजार सुरू करतात. कामावरून दिवसभर कष्ट करून पैसे घेऊन आलेले मजूर हे या सट्टेबाजांचे प्रमुख गिर्हाईक असून, आकडे लावून खुलेआम सट्टापट्टी लावून हा जुगार खेळला जातो.
एका टेबल-खुर्चीसोबत चार-पाच सट्टेबाज या लोकांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला स्वतःच सट्टा लावतात. गर्दी वाढायला लागली की गरीब व सर्वसामान्य मजुराचे दिवसभर कष्ट करून कमावलेले मजुरीचे पैसे संपेपर्यंत लोकांना खेळवले जाते. पैसे संपल्यानंतर अनेक सट्टेबाज तर ऑनलाइन देखील पैसे वसुली करतात. या प्रकरणात अनेकवेळा मोठ्या प्रमाणात वादविवाद, हाणामारी होते. याचा त्रास बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिला व इतर लोकांना देखील सहन करावा लागतो.
याबाबत पोलिसांकडे अनेकवेळा तक्रार करून देखील पोलिस प्रशासन देखील चिरीमिरीसाठी भरबाजारात खुलेआम भरणाऱ्या जुगार अड्डा, सट्टा बाजाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु, भविष्यात हे प्रमाण वाढत जाऊन भरबाजारात गंभीर गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजगुरुनगर शहर व परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, याला पोलिस प्रशासनच अधिक जबाबदार असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.