Pune Court Summons Rahul Gandhi
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील वक्तव्याशी संबंधित मानहानी प्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वीर सावरकरांच्या एका नातेवाईकाने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. लंडन दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांना न्यायालयाने ९ मे २०२५ रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
लंडन येथे मार्च २०२३ मध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याआधी राहुल गांधी यांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
राहुल यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांना सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत कागदपत्रे, भाषणाचा व्हिडिओ आणि वर्तमानपत्रातील कात्रणे मिळाली आहेत. त्यानंतर पवार यांनी याचिका दाखल केली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९४ च्या तरतुदींनुसार, याचिकेतून मजकुराचा अभ्यास करण्यासाठी आणि पुरविलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी वेळ मागितला होता. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली.
या याचिकेतून न्यायालयाने सात्यकी यांना सावरकरांच्या हिंदुत्वावरील पुस्तकाची प्रत पुरवण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती. १० जानेवारी रोजी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर झाले होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करत बदनामीच्या खटल्यात वैयक्तिक २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
१८ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने गांधी यांना मानहानीच्या खटल्याच्या नियमित सुनावणीला हजर राहण्यापासून कायमची सवलत दिली.