पुणे : गर्भवतींना झिकाची लागण झाल्यास आणि बाळापर्यंत संसर्ग पोहोचल्यास जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलेला १८ ते २४ आठवड्यांदरम्यान अॅनॉमली स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. महापालिके अंतर्गत ८००० गर्भवती नोंदणीकृत असून त्यांच्या अॅनॉमली स्कॅनसाठी केवळ २ मशीन उपलब्ध आहेत.
गर्भधारणेच्या वेगवेगळया टप्प्यांमध्ये बाळाचा विकास पाहण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. त्यामध्ये एनटी स्कॅन आणि अॅनॉमली स्कॅनला विशेष महत्त्व असते. गर्भवतींच्या नेहमीच्या तपासणीमध्ये या दोन्ही स्कॅनचा समावेश असतो. झिकाच्या पार्श्वभूमीवर अॅनॉमली स्कॅनला विशेष महत्व आहे.
मात्र, महापालिकेच्या केवळ कमला नेहरु रुग्णालयामध्ये अॅनॉमली स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये एक मशिन महापालिकेतर्फे, तर एक क्रस्ना डायग्नोस्टिकतर्फे चालवले जाते. खासगी रुग्णालयांमध्ये अॅनॉमली स्कॅनसाठी अडीच हजार रुपये तर एनटी स्कॅनसाठी दीड हजार रुपये खर्च येतो. महापालिकेतर्फे शहरात १९ प्रसूतिगृहे चालवली जातात.
मात्र, ही सुविधा नसल्याने गर्भवतींना खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसल्यास गर्भवती स्कॅन करुन घेणे टाळल्यास आणि त्यांना झिकाचा संसर्ग झाला असल्यास बाळाला धोका निर्माण होऊ शकतो.
वर्षाला पुण्यात ६० हजार प्रसूती वर्षाला पुण्यात सरासरी ६० • हजार गर्भवती प्रसूती होतात. त्या गर्भवतींना या झिकाचा धोका आहे. त्यासाठी त्यांनी अधिक काळजी घेणे आवशक आहे. आत्तापर्यंत ज्या गर्भवती पॉझिटिव्ह आढळल्या त्यांची नोंद महापालिकेच्या दवाखान्यात 'अतिजोखमीच्या गर्भवती' म्हणून केली आहे. बाधित गर्भवतीने या काळात ताजे अन्न खाणे, फळे खाणे, फॉलिक असिड, आयर्न या गोळ्यांचे सेवन व नियमित डॉक्टरांकडे तपासणी केल्यास बाळाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयामध्ये अॅनॉमली स्कॅन उपलब्ध आहे. सध्या उद्रेकग्रस्त भागांमधील गर्भवतींना तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, बरेचदा गर्भवतीसह त्यांचे कुटुंबीय रक्त तपासणीसाठी आणि स्कॅनसाठी तयार होत नाहीत. नागरिकांनी सहकार्य केल्यास गर्भवतींना होणारा धोका टाळता येऊ शकतो.डॉ . राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका