पुणे

गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाला नवी दिशा ; संशोधनात जीएमआरटीचा सहभाग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ब्रह्मांडातील अतिशय कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचा शोध घेण्यात राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र शास्त्रज्ञांना यश आले आहे. तब्बल पंचवीस वर्षांच्या पल्सार (मृत तारे) नोंदींचे विश्लेषण करून याबाबतचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात यश आले आहेत. या संशोधनात पुण्यातील 'जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप'ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संशोधनामुळे गुरुत्वीय लहरींचा पल्सार तार्‍यांच्या निरीक्षणावर परिणाम होतो, या आइनस्टाइनने मांडलेला सिद्धांताला पुरावा मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एनसीआरए सभागृहात गुरुवारी सकाळी जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. कमी वारंवारता असणार्‍या तार्‍यांचे गणिती मॉडेल शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. हा सर्व डेटा युरोपियन मॉडेलसोबत एकत्र करण्याचे कामदेखील सुरू आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. मात्र, त्यानंतर बर्‍याच अडचणी संशोधनात समजून घेण्यात येत होत्या. त्याचा पुढचा अभ्यास आइन्स्टाईनने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने मांडला. त्याच्या अनेक थेरीचा उलगडा या संशोधनामुळे झाला आहे.

गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचे पुरावे मिळवण्यासाठीच्या संशोधनासाठी जर्मनीतील एफेल्सबगै रेडिओ दुर्बिण, युरोपातील लव्हेल दुर्बिण, फ्रांसमधील नॅन्सरेडिओ दुर्बिण, इटलीमधील सार्डिना रेडिओ दुर्बिण, नेदरलँडमधील वेस्टरबोर्क दुर्बिण, पुण्याजवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण यांचा वापर करण्यात आला.

कृष्णविवरांवर अभ्यास सुरू
अलीकडच्या काळात सूर्यापेक्षाही मोठे कृष्णविवर आढळले आहे. त्याचादेखील अभ्यास सुरू असून, गुरुत्वाकर्षणाचा शोधही सुरू आहे. अनेक प्रकारचे सिद्धांत जगभरातील शास्त्रज्ञ यावर मांडत आहे. येत्या पंधरा वर्षांत कोणाचे सिद्धांत कितपत खरे आहेत, हे स्पष्ट होईल. जीएमआरटीमध्ये 50 ते 60 शास्त्रज्ञ 'बलसा' नावाच्या यंत्रावर याचा शोध घेत आहेत.

परिषदेतील सहभागी संस्था व देश
या संशोधनामध्ये आयएनपीटीए, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, आयआयटी रुरकी, आयसर भोपाळ, आयआयटी हैदराबाद, आयमएससी, रमण रिसर्च इन्स्टिट्यूट, जपानमधील कुमामोटो या संस्थांतील शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग होता.

पंधरा वर्षांत उलडतील रहस्ये
अवकाशात आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त शेकडो आकाशगंगा आहेत. तेथे हजारो कृष्णविवरे आहेत. त्याचा शोध येत्या दहा ते पंधरा वर्षांत नक्कीच लागेल आणि त्यामध्ये अवकाशातील अनेक रहस्ये उलगडतानाच जगासमोर विविध सिद्धांतांचा उलगडा होईल, असा अंदाज 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT