जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेढार येथील योगेश तांबोळी यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.  (Pudhari Photo)
पुणे

पिंपरी पेढार येथे लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या

Junnar News | बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेले

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा; जुन्नर तालुक्यातील (Junnar News) पिंपरी पेढार येथील योगेश तांबोळी यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (leopard) अडकला. हा बिबट्या मादी असून या मादी बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी दिली.

ठोकळ यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी पिंपरी पेंढार येथील योगेश तांबोळी यांच्या विहिरीमध्ये रात्री बिबट्या पडला होता. त्यावेळी वनखात्याच्या रेस्क्यू टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान दिले होते. परंतु परिसरामध्ये अद्यापही बिबट्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार तेथे पिंजरा लावला होता. बुधवारी (दि.२५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला. मंगळवारी (दि. २४) पिंपळवंडी येथील तोतर बेट येथे एक बिबट्या पकडला आहे. बुधवारी पुन्हा काही अंतरावर बाजूला दुसरा बिबट्या पकडला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पिंपरी पेंढार परिसरामध्ये बिबट्याने दोन महिलांचा बळीदेखील घेतला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठा आक्रोश केला होता. स्थानिक नागरिक आणि वन कर्मचारी यांच्यात झालेल्या संघर्षात त्यावेळी काही स्थानिकांवर वनविभागाने गुन्हेदेखील दाखल केले आहेत.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ

सध्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाही. १० बिबटे गुजरातला पाठवले तर ७० मादी बिबट्यांवर नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेला असल्याचे सांगितले जाते. तथापि, कृती मात्र काही होत नाही. दररोज कुठे ना कुठे बिबट्या पकडला जातो. पकडलेला बिबट्या माणिकडोह येथील निवारा केंद्रात ठेवला असे सांगितले जाते. परंतु पकडलेले बिबटे आजूबाजूच्या तालुक्यात सोडून दिले जातात अशी चर्चा होत आहे. पकडलेले सगळेच बिबटे वनविभागाला सांभाळणे शक्य नसल्याने ते इतरत्र सोडून दिले जातात. हे खासगीत वन विभागाचे कर्मचारीदेखील सांगत आहेत.

बिबट्यांना गोळ्या घालाव्यात अन्यथा....

जुन्नर तालुक्यात सध्या बिबट्यांची वाढणारी संख्या आणि पाळीव प्राणी होत असलेले हल्ले विचारात घेता वन विभागाने आता बिबटे पकडण्याऐवजी त्यांना थेट गोळ्या घालाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी केली आहे. ते म्हणाले की, वनविभाग व शासन बिबट्या संदर्भात फक्त टोलवाटोलवी करत आहे. पिंजरा लावणे, बिबट्या पकडणे आणि तो पुन्हा सोडून देणे, एवढेच काम वन खाते करीत आहे. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आता वन खात्याने बिबट्यांना गोळ्या घालाव्यात अन्यथा शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मागील आठवड्यामध्ये मांजरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरामध्ये बिबट्याने प्रवेश केला होता. त्यावेळी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही दुर्घटना घडू शकली असती. आता शासनाने जनतेच्या भावनांशी खेळू नये, बिबट्यांना थेट गोळ्या घालण्याचीच परवानगी द्यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात जोर वाढू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT