

Leopard News: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील तोतर मळ्यातील वसंत विठ्ठल ठोकले यांच्या शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. २४) बिबट्या अडकल्याची माहिती ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी दिली. पकडलेला बिबट्या सुमारे तीन वर्षाचा असून त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.
ठोकळ म्हणाले की, तोतरबेट येथील प्रवीण पंढरीनाथ काकडे या स्थानिक शेतकऱ्याने परिसरामध्ये बिबट्या असल्याचे वनविभागाला कळविले होते. तसेच बाजूला शाळा असल्यामुळे व दररोज सायंकाळी बिबट्या या ठिकाणाहून ये-जा करीत असल्याचे आम्ही स्वतः पाहिले असल्याचे त्यांनी सांगितल्याने वनविभाग आणि त्या ठिकाणी तातडीने तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष म्हणून कोंबडी देखील ठेवण्यात आली होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला असून त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हालविण्यात आले आहे.
दरम्यान या परिसरामध्ये अद्यापही चार ते पाच बिबटे असून ओळख हाताने पुन्हा या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. तसेच पकडलेले बिबटे इतरत्र सोडून न देता या बिबट्यांची नसबंदी करावी: अन्यथा हे सगळे बिबटे ताडोबा सारख्या जंगलामध्ये नेऊन ठेवावेत अशी मागणी प्रवीण पंढरीनाथ काकडे यांनी केली आहे.
वनक्षेत्रपाल लहू ठोकळ म्हणाले की, या परिसरामध्ये जर बिबट्या अद्यापही असेल तर पुन्हा वनविभाग येथे पिंजरा लावील. सध्या उसाची तोडणी सुरू असल्याने बिबट्या इतरत्र सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. शाळकरी मुलांबरोबर शेतामध्ये काम करत असलेल्या लोकांनी याबाबतची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.