'ऊसशेतीत एआय तंत्रज्ञान वापरासाठी संयुक्त पथदर्शी प्रकल्प राबविणार' Pudhari
पुणे

Sugarcane Farming: 'ऊसशेतीत एआय तंत्रज्ञान वापरासाठी संयुक्त पथदर्शी प्रकल्प राबविणार'

बारामती कृषी विज्ञान केंद्र, राज्य सहकारी बँक आणि ‘श्री सोमेश्वर सहकारी’ यांच्यात होणार त्रिपक्षीय करार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरातून खर्चात होणारी बचत आणि वाढणारी उत्पादकता बारामती कृषी विज्ञान केंद्रात यशस्वी झाली आहे. राज्यात हा प्रयोग सर्वदूर करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सहकारी साखर कारखान्यांत राबविण्यावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रमुख संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रविवारी (दि. 1) शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि बारामती कृषी विज्ञान केंद्रात त्रिपक्षीय करार करून प्रत्यक्षात या कारखान्याच्या प्रक्षेत्रावर एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवड आणि प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलमधील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभागृहात दुपारी अडीच वाजता बैठक झाली. (Latest Pune News)

या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ, सहकारचे अपर निबंधक संतोष पाटील, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील व साखर उद्योगाशी संबंधित अन्य मान्यवर उपस्थित होते.

त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापराबाबत पुढील सोमवारी (दि. 9) मांजरी येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात प्रमुख सहकारी आणि खासगी कारखान्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अडचणीतील साखर उद्योगास कशी मदत करायची?

राज्य सहकारी बँकेने अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करावी, अशी मागणी बैठकीत साखर उद्योगाकडून करण्यात आली. त्या वेळी यापूर्वी एफआरपीची रक्कम देण्यासाठी दिलेली रक्कम कुठे गेली? याचा प्रथम हिशेब द्यायला हवा. त्यावरही विस्तृत चर्चा झाली. काही कारखान्यांनी दिलेल्या कर्ज रकमेचा विनियोग त्याच कारणासाठी करीत नसल्याचा मुद्दाही काही कारखाना प्रतिनिधींनीच मांडल्याचे समजते. त्यामुळे राज्य बँकेकडून कर्ज मागणीचा विषय तूर्तास बाजूला पडला.

दुग्धजन्य घटकांपासूनही इथेनॉल उत्पादन शक्य

बैठकीमध्ये ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापराबरोबरच साखरेपासून पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड (पीएलए) हा प्लास्टिकसारखा पदार्थ तयार करण्यावरही सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी काही कंपन्यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय दुधापासूनच्या पनीरनिर्मितीनंतर शिल्लक राहणार्‍या दुग्धजन्य घटकांपासूनही इथेनॉलनिर्मिती करण्यावरही चर्चा आणि सादरीकरण झाल्याची माहिती बैठकीनंतर सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT