पुणे

सर्वसामान्यांचा विचार करून मांडलेला अर्थसंकल्प; खासदार, आमदारांनी  केले स्वागत

Laxman Dhenge
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे शहरातील खासदार, आमदार यांनी स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून मांडण्यात आला आहे. महिला, युवक, शेतकरी, अल्प उत्पन्न गटातील नागरिक अशा सर्वच समाजघटकांचा विचार अर्थसंकल्पात केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

निर्णायक अर्थसंकल्प

केंद्र सरकारने मांडलेला हा अंतरिम अर्थसंकल्प एका अर्थाने गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाच आहे. या अर्थसंकल्पात निवडणुकीपूर्वीच्या घोषणा नाहीत. सध्याचे सरकार हे घोषणाबाजी सरकार नसून प्रत्यक्ष कृतीतून काम करणारे सरकार आहे, हेच यातून स्पष्ट होते. रस्ते आणि रेल्वे मार्गाचा विकास, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे तसेच महिला, युवा, कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी तरतुदी करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. तो समाधानकारक आहे. सर्वसामान्यांवर कोणतीही करवाढ न लादणारा हा चांगला आणि निर्णायक अर्थसंकल्प आहे.
श्रीरंग बारणे (खासदार) 
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प हा 'विकसित भारत'चा निर्धार करणारा आहे. हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. 1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा, 300 युनिटपर्यंत मोफत वीज, गरिबांसाठी हक्काचे घर योजना, 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करून युवांसाठी राखीव ठेवणे असे मोठे निर्णय अर्थसंकल्पात घेतले आहेत. विकासाला चालना, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर विकसित भारताची दिशा ठरवणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकर्यांना केंद्रबिंदू मानून तयार केला आहे.
महेश लांडगे (आमदार)
गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून आणि महिलांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात सुचविलेल्या उपाययोजना या उपयुक्त आहेत. तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा, हा दृष्टिकोन अर्थसंकल्प मांडताना ठेवलेला आहे. सर्व समाजघटकांना उभारी देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांचे नियोजन केले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प निश्चितच सर्वसमावेशक झाला आहे.
अण्णा बनसोडे (आमदार) 
युवक, महिला आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात युवकांना नोकर्यांसाठी प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांना सुविधा दिल्या आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. हा अर्थसंकल्प बनविताना तळागाळातल्या लोकांच्या विकासाचा विचार केला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा ठरला आहे.
उमा खापरे (आमदार)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT